सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान प्रतिनिधी निश्चित करण्याची ठराव प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. गावागावांत मतदानाचा ठराव कोणाच्या बाजूने होणार, यावरून विविध गटांमध्ये जोरदार चुरस पाहायला मिळते आहे. अनेक ठिकाणी राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत.

जिल्ह्यात या प्रक्रियेसाठी पात्र संस्थांपैकी आतापर्यंत बहुसंख्य संस्थांचे ठराव सहायक निबंधक कार्यालयात प्राप्त झाले आहेत. मतदान प्रतिनिधी नियुक्तीचे ठराव सादर करण्याची अंतिम मुदत आज (बुधवार) संपत असल्याने आता राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत.

प्राप्त ठरावांमध्ये प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था, नागरी सहकारी पतसंस्था, विविध कृषी व इतर उत्पादन संस्था, तसेच औद्योगिक, मजूर, ग्राहक, पाणीपुरवठा व इतर विविध संस्थांचा समावेश आहे. उर्वरित विविध प्रकारच्या सहकारी संस्थांचे ठराव अंतिम टप्प्यात आहेत. ठराव प्रक्रियेदरम्यान सातारा तालुक्यातील अनेक गावांमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे.

संस्थांमधील मतदान प्रतिनिधी निश्चित करण्यासाठी विविध गटांकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. अनेक ठिकाणी विद्यमान समीकरणांना धक्का बसत आहे. काही संस्थांमध्ये मतदार प्रतिनिधी ठरवताना मोठी चुरस निर्माण झाली असून, स्थानिक पातळीवर राजकीय उलथापालथी घडताना दिसत आहेत. बुधवारनंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीतील पुढील रणनीती याच ठरावांवर अवलंबून राहणार आहे. त्यामुळे सातारा तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. गावागावांत मतदानाचा ठराव कोणाच्या बाजूने होणार, यावरून विविध गटांमध्ये जोरदार चुरस पाहायला मिळते आहे. अनेक ठिकाणी राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत.

या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात खासदार उदयनराजे भोसले, जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि खासदार नितीन पाटील, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील आणि माजी मंत्री शशिकांत शिंदे, आमदार मनोज घोरपडे, आमदार महेश शिंदे यांच्या समर्थकांमध्येही मोठी स्पर्धा पाहायला मिळत आहे. भाजपकडून शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे या निवडणुकीची सूत्रे देण्यात आली आहेत. सर्व ठराव स्पष्ट झाल्यावर राजकीय ताकद नेमकी कोणाच्या पारड्यात आहे, याचे प्राथमिक चित्र स्पष्ट होणार आहे.