सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विकास सेवा सोसायटी मतदारसंघातील मतदारांचे ठराव संकलन करण्याची प्रक्रिया बुधवारी पूर्ण झाली. मात्र, शेवटच्या दिवशी जास्तीत जास्त मतदार आपल्याच गोटातील असावेत यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ‘साम, दाम, दंड, भेद’ नीतीचा वापर केल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि भाजपचे कार्यकर्ते अनेक ठिकाणी आमनेसामने आल्याने संघर्ष पाहायला मिळाला.
जावळी तालुक्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या आखाडे या बालेकिल्ल्यात जाऊन ठराव करून घेतल्याने मोठा तणाव निर्माण झाला. यानंतर आखाडे परिसरात जमावबंदीचे आदेश लागू करून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.
दुसरीकडे, ६ गावांचा समावेश असलेल्या हातगेघर विकास सेवा सोसायटीची सभा कोरमअभावी रद्द झाली. यानंतर भाजपचे जिल्हा परिषद सदस्य वसंतराव मानकुंबरे यांनी शिंदे यांनी संचालकांना ताब्यात ठेवल्याचा आरोप करत थेट त्यांच्या निवासस्थानी धडक दिली. मानकुंबरे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी ‘संचालक मिळाल्याशिवाय हलणार नाही’ असा आक्रमक पवित्रा घेतल्याने जावळीत नवा राजकीय संघर्ष उभा राहिला आहे.
ग्राम विकासमंत्री जयकुमार गोरे यांनी माण तालुक्यातील वरकुटे-मलवडी येथे राष्ट्रवादीच्या अभयसिंह जगताप यांच्या सोसायटीत ऐनवेळी प्रवेश करत ठराव घडवून आणून धक्का दिला. यानंतर कार्यकर्त्यांनी फटाके फोडल्याने तणाव वाढला. कराड तालुक्यात १५० हून अधिक सोसायट्या असल्याने हा तालुका संवेदनशील ठरला आहे. कोडोली सोसायटीत ठरावासाठी उघडपणे बोली लागल्याची चर्चा रंगली, तर मालखेड येथे ठरावावरून झालेल्या हाणामारीत एकाच्या हातावर वार झाल्याची घटना घडली असून, हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले आहे.
या निवडणुकीत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, खासदार उदयनराजे भोसले, बँकेचे अध्यक्ष आणि खासदार नितीन पाटील, आमदार आणि बँकेचे मार्गदर्शक रामराजे नाईक निंबाळकर,आमदार मनोज घोरपडे, आमदार डॉ. अतुल भोसले आणि उदयसिंह पाटील उंडाळकर यांसारख्या दिग्गजांची प्रतिष्ठापणाला लागली आहे. प्रत्यक्ष मतदानापर्यंत हा संघर्ष कोणत्या टोकाला जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बँकेच्या निवडणुकीत प्रथमच असा टोकाचा संघर्ष जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना अनुभवायला मिळत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकारण तापले आहे.
