सातारा:​ सातारा जिल्हा व सत्र न्यायालय बॉम्बने उडवून देण्याचा धमकीचा ई-मेल मिळाल्याने सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी परिसरात मोठी खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने हालचाली करत संपूर्ण न्यायालय परिसर रिकामा केला. बॉम्ब शोधक व नाशक पथकाने (बीडीडीएस) घटनास्थळी धाव घेत व्यापक तपासणी मोहीम सुरू केली आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा न्यायालयाच्या अधिकृत ई-मेल आयडीवर सोमवारी सकाळी न्यायालयात बॉम्ब ठेवल्याचा आणि इमारत उडवून देण्याचा धमकीचा संदेश आला. ई-मेल पाहताच न्यायालय प्रशासनाने सतर्कता दाखवत तात्काळ सातारा शहर पोलीस ठाण्याला याची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह मोठा पोलीस बंदोबस्त न्यायालय परिसरात दाखल झाला.

​सुरक्षा आणि खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी तातडीने न्यायालयाच्या मुख्य इमारतीसह सर्व कक्ष रिकामे करण्याचे आदेश दिले. न्यायाधिश, वकील, न्यायालयीन कर्मचारी आणि आपल्या कामासाठी आलेल्या पक्षकारांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसर आणि नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते.

​यानंतर लगेचच ‘बॉम्ब शोधक व नाशक पथक’ आणि ‘स्वान पथका’ने संपूर्ण इमारतीची पाहणी सुरू केली. न्यायालयाचे विविध कक्ष, न्यायमूर्तींचे दालन, रेकॉर्ड रूम आणि परिसर यांची कसून तपासणी करण्यात येत आहे. खबरदारी म्हणून न्यायालय परिसराला छावणीचे स्वरूप आले असून मुख्य प्रवेशद्वारावर कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

आज आठवड्याचा पहिला दिवस असल्याने न्यायालयात वकील पक्षकार न्यायालयीन कर्मचारी कामकाजात होते. त्याचवेळी ईमेलवर संदेश आल्याने व मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त पोलीस तातडीने न्यायालय परिसरात दाखल झाल्याने काही कळायच्या आत पोलिसांनी पक्षकार वकील कर्मचारी न्यायाधीश आणि सर्वांनाच परिसर मोकळा करण्यास सांगितले. तातडीने सर्व न्यायालय मोकळे करण्यात आले यामुळे न्यायालय परिसरात मोठी गर्दी झाली आहे. ही माहिती सर्वत्र पसरल्याने न्यायालय परिसरात  बघ्यांचीही मोठी गर्दी जमा झाली आहे.

​दरम्यान, हा ई-मेल कुठून आणि कोणी पाठवला, याचा शोध पोलीस विभागाचे सायबर सेल घेत आहे. ही केवळ अफवा आहे की मोठा कट, याचा तपास सुरू असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि शांतता बाळगावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.