सातारा : सातारा जिल्हा व सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल सोमवारी प्राप्त झाल्याने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली. मात्र, सुरक्षा यंत्रणांनी तात्काळ केलेल्या कसून तपासणीत न्यायालयाच्या आवारात कोणतीही संशयास्पद किंवा आक्षेपार्ह वस्तू आढळून आलेली नाही, अशी माहिती पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी दिली आहे. ही धमकीची अफवा असल्याचे स्पष्ट झाल्याने नागरिक आणि प्रशासनाने मोठा सुटकेचा श्वास सोडला आहे.

​धमकीचा ई-मेल मिळताच पोलीस प्रशासन अत्यंत सतर्क झाले. सुरक्षेची सर्वोच्च खबरदारी म्हणून न्यायालयातील न्यायाधीश, वकील, पक्षकार, कर्मचारी व इतर उपस्थितांना तातडीने सुरक्षित बाहेर काढण्यात आले. तसेच परिसरातील अनधिकृत व अपरिचित वाहनेही हटवण्यात आली. संपूर्ण न्यायालय परिसर सील करून मानक कार्यपद्धतीनुसार (एसओपी) कसून तपासणी मोहीम हाती घेण्यात आली.

​या मोहिमेत बॉम्ब शोधक व नाशक पथक (बीडीडीएस), श्वान पथक (डॉग स्क्वॉड), क्विक रिस्पॉन्स टीम (क्यूटीआर) आणि पोलिसांच्या विशेष शाखेच्या पथकांनी संयुक्तपणे संपूर्ण इमारत व परिसराचा कोपरा न् कोपरा पिंजून काढला. आपत्कालीन परिस्थितीसाठी अग्निशामक दल व वैद्यकीय पथकही सज्ज ठेवण्यात आले होते.

संपूर्ण न्यायालय परिसर सील करून मानक कार्यपद्धतीनुसार (एसओपी) कसून तपासणी मोहीम हाती घेण्यात आली.

​तांत्रिक तपास सुरू

हा धमकीचा ई-मेल नेमका कुठून आणि कोणाकडून पाठवण्यात आला, याचा सखोल तांत्रिक तपास सायबर सेल आणि पोलिसांकडून सुरू आहे. ई-मेलचे आयपी ॲड्रेस आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपीचा शोध घेतला जात आहे.

​अफवांवर विश्वास ठेवू नका – एसपी पिंगळे

नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवून गैरसमज पसरवू नये, असे आवाहन पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी केले आहे. सातारा शहरात पूर्णपणे शांतता असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणामागील दोषींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.