सातारा : श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या गोशाळेत अवघ्या दोन फूट उंचीची पुंगनूर गाय दाखल झाली आहे. श्री ब्रह्मचैतन्य महाराज यांना गायींविषयी अधिक प्रेम होते.
‘श्रीं’चा हा गोरक्षण व गोपालनाचा वारसा येथील समाधी मंदिर समितीने अखंडितपणे सुरू ठेवला आहे. समाधी मंदिर परिसरातील गोशाळेत आजही उत्तमरीत्या गायींचे संगोपन केले जाते. ‘श्रीं’च्या समाधी दर्शनासाठी येणारे भाविक या गोशाळेलाही आवर्जून भेट देतात.
गोंदवले (ता. माण) येथील श्री गोंदवलेकर महाराज संस्थानमध्ये कुर्तकोटी इमारतीमागे एक आधुनिक आणि सुसज्ज गोशाळा आहे. श्री महाराजांचे गाईंवर खूप प्रेम होते, त्यांच्या स्मृती जपण्यासाठी आणि गोसेवेसाठी ही गोशाळा चालवली जाते. या गोशाळेच्या बाजूलाच अत्याधुनिक गोबरगॅस प्रकल्प देखील उभारण्यात आला आहे. सकाळी काकडआरतीचे वेळी व संध्याकाळीही गोमातेची आरती करून नैवेद्य (गोग्रास) दाखविण्याची पद्धत अगदी सुरुवातीपासून आजपर्यन्त चालू आहे. हे संस्थान गोंदवलेकर महाराजांच्या भक्ती आणि सेवेसाठी प्रसिद्ध आहे.
आंध्र प्रदेशातील सुप्रसिद्ध बालाजी मंदिरात तिरुपती बालाजीच्या मूर्तीवर पुंगनूर गायींचा दुग्धाभिषेक केला जातो. असाच दुग्धाभिषेक गोंदवल्यातील श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या समाधीवरदेखील व्हावा, अशी इच्छा भाविकांनी व्यक्त केली होती. तसेच या गोरक्षणाला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने गोंदवल्यातील श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या भक्तांकडून गोशाळेसाठी देशी गायींचे दान करण्यात आले आहे. अवघ्या दोन फूट उंचीच्या असलेल्या या गायी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.
श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या भक्तांकडून हा गोदान सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तत्पूर्वी श्री गणेश यज्ञ, कामधेनू यज्ञ करण्यात आला. या छोट्या गायींचे आगमन होताच उपस्थित भाविकांनी श्रीराम नामाच्या जयघोषात स्वागत केले. मंदिर समितीच्या विश्वस्तांनी या गाईंचे शंकरा व शंकरी असे नामकरण करताच सर्वांनी आनंद व्यक्त केला. त्यानंतर या गायींच्या विवाहाचा सोहळाही मोठ्या उत्साहात पार पडला. अवघ्या दोन फूट उंची असलेल्या या गायी पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे.
पुंगनूर गाय
पुंगनूर गाय ही भारतातील आंध्र प्रदेशात आढळणारी एक स्थानिक जात आहे. तिचा आकार लहान, दूध उत्पादन जास्त आणि सहनशीलता ही तिची वैशिष्ट्ये आहेत. पुंगनूर गायी साधारणपणे ७०-९०सेमी उंच असतात आणि त्यामुळे त्या खूप छोट्या आणि हाताळण्यास सोप्या असतात. पुंगनूर गाय १२ ते १५ वर्षे वयाची असते, वय, आरोग्य आणि वंशाच्या घटकांमुळे, पुंगनूर गायीची किंमत ५० हजार ते एक लाखापर्यंत असू शकते.
