सातारा: सातारा जिल्ह्यात गुरुवारपासून पावसाने पुन्हा एकदा रौद्ररूप धारण केले असून, मुसळधार पाऊस सुरू आहे. पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या जोरदार वृष्टीमुळे कोयनेसह जिल्ह्यातील प्रमुख धरणांमधील पाणीसाठा वेगाने वाढला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. कृष्णा, वेण्णा, नीरा आणि उरमोडी नदीकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनाने ‘हाय अलर्ट’ जारी केला आहे. हवामान विभागाने सातारा, पुणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे.
सातारा शहर, महाबळेश्वर, नवजा, कोयनानगर, पाटण, जावली आणि वाई या पश्चिमेकडील डोंगराळ भागात पावसाचा जोर प्रचंड आहे. दुसरीकडे माण, खटाव आणि फलटण या पूर्व भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळत आहेत. आशिया खंडातील महत्त्वाच्या कोयना धरणातील पाणीसाठा ८६ टीएमसीवर (सुमारे ८२ टक्के) पोहोचला आहे. पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणाचे सहा वक्र दरवाजे दोन फुटांपर्यंत उचलण्यात आले आहेत. २५,००५ क्युसेक आवक होत असताना, कोयना नदीपात्रात ११,६८० क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे.
डोंगरदऱ्यातील ठोसेघर, लिंगमळा आणि भांबवली वजराई धबधबे पूर्ण क्षमतेने कोसळत असून, पर्यटकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. मात्र, दुर्घटना टाळण्यासाठी पर्यटकांनी सुरक्षित अंतर ठेवावे, सेल्फीसाठी धोक्याच्या ठिकाणी जाऊ नये आणि नदीपात्रात उतरणे टाळावे, असे आवाहन सातारा सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता आणि जिल्हा प्रशासनाने केले आहे. महामार्गावर ठिकठिकाणी पाणी साठले आहे. त्यामुळे वाहनचालकांना काळजीपूर्वक प्रवास करावा लागत आहे. शहरी भागात अनेक ठिकाणी रस्त्याला मोठमोठाले खड्डे पडले आहेत.
धरणांमधून होणारा विसर्ग (पाणी सोडण्याचे प्रमाण सकाळी आठ वाजता):
कोयना: १७,५८५ क्युसेक्स
धोम: ७,८४७ क्युसेक्स
धोम बलकवडी: ४,४०५ क्युसेक्स
कान्हेरी: ३,८५३ क्युसेक्स
उरमोडी: ३,४३५ क्युसेक्स
तारळी: ४,००० क्युसेक्स
