सातारा: साताऱ्यात सुरू असणाऱ्या संततधार पावसामुळे नद्या, धरणे, तलावांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. डोंगरदऱ्यांतील धबधबे तुडुंब भरून वाहू लागले आहेत. ठोसेघर धबधबा आणि लिंगमळा धबधबा पूर्ण क्षमतेने कोसळत असून पर्यटकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार सातारा, पुणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना रेड अलर्ट, तर मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

वेगवान वाऱ्यासह अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. मागील काही दिवसांतील मुसळधार पावसाने धरणांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. तारळी नदीवरील ठोसेघर लघु पाटबंधारे तलाव पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यावरून पाणी वेगाने वाहू लागले आहे. तलावाच्या सांडव्यावरून फेसाळत वाहणारे पाणी पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने हजारो पर्यटकांनी वर्षा सहलीचा मनमुराद आनंद लुटला. महाबळेश्वर येथील वेण्णा तलाव भरून वाहू लागला असून लिंगमळा धबधबाही भरून वाहत आहे.

मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रमुख धरणांमध्ये पाण्याची पातळी वेगाने वाढत आहे. कोयना धरणात २२.९२ टीएमसी (१७.८० टीएमसी उपयुक्त) जलसाठा झाला असून ४४,०९७ क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. धरणातून अद्याप विसर्ग करण्यात आलेला नाही.

जिल्हा पाटबंधारे विभागाच्या अहवालानुसार, कण्हेर, धोम, उरमोडी, तारळी, बलकवडी, वांग, वीर यांसह अनेक धरणांमध्येही जलसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. काही लघु प्रकल्प भरून सांडव्यावरून पाणी वाहू लागले असून सिंचनासाठीची परिस्थिती समाधानकारक बनत आहे. जलसाठ्यात झालेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर कृष्णा नदी तसेच कुडाळी, वेण्णा, उरमोडी, तारळी, वांग, उत्तरमांड आणि कोयना या उपनद्यांवरील सिंचनासाठीच्या उपसा योजनांवरील बंदी शिथिल करण्यात आली आहे. संबंधित विभागांना आवश्यक कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले आहेत.

धबधबे आणि तलाव परिसरात मोठी गर्दी होत असल्याने पर्यटकांनी सुरक्षित अंतर राखावे, सेल्फीसाठी धोकादायक ठिकाणी जाऊ नये, नदीपात्र व सांडव्याजवळ जाणे टाळावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. मुसळधार पावसामुळे जिल्हा हिरवागार झाला आहे. निसर्गाचे रूप पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे.

जिल्ह्यात रविवारी (दि. ५) सरासरी २४.४ मि.मी. आतापर्यंत एकूण सरासरी १०८.९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुकानिहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. सर्व आकडे मि.मी.मध्ये असून कंसातील आकडे आतापर्यंतच्या एकूण पावसाचे आहेत. सातारा २४.७ (९२.८ ), जावली-मेढा ६६.८(२३४.३), पाटण ३०.४(१५२.६), कराड २१ (८७.४), कोरेगाव १७.३(६६.६), खटाव-वडूज ८.२(३६.६), माण – दहिवडी ४.७ (१२.७), फलटण ५.१ (३१.८), खंडाळा १४.४(८०.७), वाई २९.१ (१६१.९), महाबळेश्वर १०८.१ ( ५४८.६) या प्रमाणे पाऊस झाला आहे.