सातारा: सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून बेकायदेशीर अग्निशस्त्रांचा सुळसुळाट झाला असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) आणि भुईंज पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या धडक कारवाईत एकूण ४ देशी पिस्टल, जिवंत काडतुसे आणि वाहनांसह लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत एका तडीपार गुन्हेगारासह २४ वर्षीय तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे.
पहिली धडक कारवाई भुईंज पोलिसांनी सुरूर ब्रिज खाली केली. गस्तीवर (पेट्रोलिंग) असताना पोलिसांनी संशयास्पद वाटणाऱ्या २४ वर्षीय तरुणाला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली. त्याच्याकडे ४५ हजार रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्टल आढळून आल्याने त्याला तात्काळ अटक करण्यात आली.
दुसऱ्या मोठ्या घटनेत, जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केलेला सराईत गुन्हेगार महेश गणपत इंगळे (वय २७, रा. आखरी रस्ता, मंगळवार पेठ, फलटण) हा शस्त्रांचा सौदा करण्यासाठी साताऱ्यात आल्याची बातमी स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके व एलसीबीच्या पथकाने करंजे येथील महानुभव मठ परिसरात रात्रीच्या सुमारास सापळा रचला.
संशयित आरोपी दुचाकीवरून तेथे पोहोचताच पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून मॅग्झीनसह ३ गावठी पिस्टल, ३ जिवंत काडतुसे, मोबाईल आणि मोटारसायकल असा एकूण ३ लाख २९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीविरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात तडीपारीचा भंग आणि अवैध शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तडीपार आरोपीने एकाच वेळी ३ गावठी पिस्टल साताऱ्यात आणल्यामुळे पोलिसांच्या चिंतेत भर पडली आहे. ही शस्त्रे त्याने कुठून आणली, यामागे कोणती टोळी आहे आणि ही पिस्टल नेमकी कोणाला विकली जाणार होती, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत.
