सातारा : साताऱ्यातील दहीहंडी महोत्सवानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे ‘एआय’ तंत्रज्ञान, डिजिटल एडिटिंग आणि मॉर्फिंगद्वारे तयार केलेले बदनामीकारक छायाचित्र समाज माध्यमांवर प्रसारित करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. तसेच आरोपींना तत्काळ अटक करावी, अशी आक्रमक मागणी ‘आम्ही सातारकर’ संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवदेनाद्वारे आपले गाऱ्हाणे मांडले.

शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी आधीच गुन्हा दाखल झाला असून, समाज माध्यमांवर बदनामीकारक मजकूर आणि पोस्ट पसरवणाऱ्या सर्व हँडलर्सवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी निवेदनात केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे देशाचे आराध्य दैवत असून, त्यांच्या वंशजांबद्दल संपूर्ण महाराष्ट्राला सार्थ अभिमान आहे. मात्र, काही माथेफिरू आणि समाजकंटक कुटील डाव रचून छत्रपतींच्या वारसांची सामाजिक प्रतिष्ठा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा विकृत मानसिकतेला वेळीच आळा घालणे गरजेचे असल्याचे संघटनेने स्पष्ट केले.

येत्या दोन दिवसांत संबंधित आरोपींना अटक न झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही संघटनेने दिला आहे. निवेदन देतेवेळी संघटनेचे प्रमुख मार्गदर्शक अमर मोकाशी, संस्थापक मनोहर भातुसे, अध्यक्ष अमर शेलार, तालुका अध्यक्ष अतुल काटकर, शहर प्रमुख अमर बेंद्रे, सचिव मनोज पुजारी यांच्यासह भूषण पवार, मंगेश काशीद, सनी भिसे, अविनाश पवार, गणेश कुडवे, सुमित भोसले व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.