सातारा : जगभरातील पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असलेल्या साताऱ्यातील जागतिक वारसास्थळ कास पठारावरील बहुप्रतीक्षित फुलोत्सवाला आजपासून दिमाखात सुरुवात होत आहे. सध्या पठारावर चवर, तेरडा, सीतेचे आसवे, गेंद, नभाळी, आभाळी कंदील पुष्प आणि कुमुदिनी फुलांचा बहर येऊ लागला आहे. पर्यटकांच्या स्वागतासाठी कास वन समिती सज्ज झाली असून, वाढती गर्दी व निसर्गसंपदेचे संवर्धन लक्षात घेऊन दिवसाला केवळ तीन हजार पर्यटकांनाच प्रवेश दिला जाणार आहे.

पर्यावरणाचे रक्षण आणि गर्दीचे नियोजन करण्यासाठी शनिवार, रविवार व शासकीय सुटीच्या दिवशी केवळ ऑनलाइन बुकिंग असलेल्या पर्यटकांनाच प्रवेश मिळेल; थेट येणाऱ्या पर्यटकांना प्रवेश दिला जाणार नाही. पर्यटकांना http://www.kas.ind.in या अधिकृत संकेतस्थळावरून बुकिंग करता येईल. १२ वर्षांवरील पर्यटकांना २०० रुपये प्रवेशशुल्क असून, त्यात पार्किंग ते पठारापर्यंत बससेवा समाविष्ट आहे. तसेच एकीव व कुमुदिनी टेहळणी मनोऱ्यावरून (वॉच टॉवर) परिसराचे विहंगम दृश्य पाहता येणार आहे.

दरम्यान कास पठार हंगाम २०२६ कालावधीचा अधिकृत प्रारंभ उद्या मंगळवारी सकाळी ११ वाजता पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या प्रसंगी खासदार उदयनराजे भोसले, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मकरंद जाधव-पाटील व जयकुमार गोरे उपस्थित राहणार आहेत.

निसर्ग संवर्धनाचे आवाहन

पर्यटनाचा विस्तार केवळ पठारापुरता मर्यादित न ठेवता परिसरातील नैसर्गिक स्थळांचा विकास केला जात आहे. यंदा निसर्गसौंदर्य व जैवविविधतेने नटलेले ‘मंडपघळ’ हे पर्यटकांसाठी मुख्य आकर्षण ठरणार आहे, अशी माहिती कास समितीचे उपाध्यक्ष प्रदीप कदम यांनी दिली. पर्यटकांनी फुलांचे संवर्धन करावे, फुलांमध्ये पाय देऊ नये व कचरा करू नये, असे आवाहन सातारा वन विभाग आणि कास पठार सहा गाव संवर्धन समितीने केले आहे.

दर आणि सुविधा :

प्रवेशशुल्क : २०० रुपये (१२ वर्षांवरील)
शालेय सहल : ४० रुपये प्रतिविद्यार्थी.

विद्युत वाहन: १०० रुपये प्रतिव्यक्ती
गाइड शुल्क: २०० रुपये प्रतितास (१० जणांचा ग्रुप).