सातारा : कास पठारावरून पर्यटकांना घेऊन साताऱ्याच्या दिशेने येणाऱ्या एका सोलापूर येथील ट्रॅव्हल्स बसचा यवतेश्वर घाटात रविवारी रात्री भीषण अपघात झाला. घाटातील पॉवर हाऊसजवळ अचानक बसचे ब्रेक निकामी झाल्यामुळे चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. मात्र, प्रसंगावधान राखत बस रस्त्याच्या कडेला असलेल्या सुरक्षा कठड्याला धडकून थांबल्याने मोठा अनर्थ टळला आणि बसमधील प्रवासी थोडक्यात बचावले.
मिळालेल्या माहितीनुसार, वीकेंडनिमित्त कास परिसरात सोलापूर हून फिरण्यासाठी आलेले पर्यटक बसने साताऱ्याच्या दिशेने परतत होते. यवतेश्वर घाटातील पॉवर हाऊसजवळ तीव्र उतारावर अचानक बसची ब्रेक यंत्रणा निकामी झाली. गाडी वेगात असताना ब्रेक फेल झाल्याचे लक्षात येताच चालकाने बसवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. अनियंत्रित झालेली बस रस्त्याच्या कडेला असलेल्या मजबूत कठड्याला जाऊन धडकली आणि तेथेच थांबली. या धडकेमुळे घाटातील खोल दरीत बस कोसळण्यापासून वाचली.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. तसेच सातारा पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने बसमधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी बसचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
अपघातामुळे यवतेश्वर घाटातील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून अपघातग्रस्त वाहन बाजूला केले आणि वाहतूक सुरळीत केली. या घटनेबाबत सातारा पोलीस अधिक तपास करत असून, चालकाचा जबाब नोंदवून घेण्याचे काम सुरू आहे. घाटातील धोकादायक वळणे आणि उतारावर वाहनांची तपासणी करूनच प्रवास करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
