सातारा : पुणे-सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटात आज दुपारी ११ वाजेपासून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून संपूर्ण घाट रस्ता ठप्प झाला आहे. घाटात विरुद्ध दिशेने येणारा एक टँकर रस्त्यातच आडवा झाल्याने ही कोंडी निर्माण झाली. त्यातच वाहनांची मोठी संख्या पाहता ही परिस्थिती दिवसभर कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

​आज गांधी जयंतीची शासकीय सुट्टी आणि त्याला जोडून आलेल्या सलग तीन दिवसांच्या सुट्ट्यांमुळे पुणे व मुंबईतून मोठ्या प्रमाणावर नागरिक घराबाहेर पडले आहेत. सध्या पितृ पंधरवडा सुरू असल्याने अनेक जण गावी जात आहेत, तर दुसरीकडे पाचगणी, महाबळेश्वर, कास पठार आणि किल्ले रायरेश्वर पठारावर पर्यटकांचा ओघ वाढला आहे.

​सप्टेंबरच्या उत्तरार्धात पावसाळ्यानंतर या संपूर्ण पठारांवर विविधरंगी रानफुलांचा बहर आला असून निसर्गाची मखमली चादर पांघरल्याचा नयनरम्य नजारा पाहायला मिळत आहे. हा अद्भुत आविष्कार अनुभवण्यासाठी मुंबई, पुणे, सातारा आणि रायगड येथून शिवप्रेमी व निसर्गप्रेमी मोठ्या संख्येने बाहेर पडल्याने महामार्गावरील ताण प्रचंड वाढला आहे.

​याशिवाय, पुणे-सासवड-जेजुरी-लोणंद मार्गे सातारा जाणारी वाहतूक वडूथ येथील पुलावरून बंद करण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गावरील सर्व वाहतूक खंबाटकी घाटाकडे वळवण्यात आल्याने कोंडीत अधिकच भर पडली आहे. अपघातग्रस्त टँकर हटवून वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न महामार्ग पोलिसांकडून सुरू आहेत. आनेवाडी टोल नाक्यावर वाहनांच्या नेहमी प्रमाणे रांगा लागलेल्या आहेत.