सातारा : महाराष्ट्रात विक्री व वाहतुकीस बंदी असलेला गुटखा चुरमुऱ्यांच्या पोत्यांआड लपवून ट्रकमधून पुण्याच्या दिशेने नेला जात असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने राष्ट्रीय महामार्गावर धाडसी कारवाई केली. या कारवाईत १७ लाख ६५ हजार ९४० रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखू, तसेच ७ लाख ५० हजार रुपये किमतीचा ट्रक असा एकूण २५ लाख १५ हजार ९४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जिल्ह्यात अवैध गुटख्याची वाहतूक आणि विक्रीविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे व अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक कार्यरत होते.
सांगलीकडून पुण्याच्या दिशेने एक ट्रक (एमएच-१० झेड-४६९६ ) गुटख्याची वाहतूक करत असल्याची बातमी मिळताच पथकाने नागठाणे (ता. सातारा) येथील राष्ट्रीय महामार्गावरील पुलाजवळ सापळा रचून ट्रक अडवला. ट्रकमधील दोघांकडे प्राथमिक चौकशी केली असता, त्यांनी वाहनात केवळ पानमसाला असल्याचे सांगितले. मात्र, संशय आल्याने पोलिसांनी ट्रकमधील मालाची सखोल तपासणी केली. त्यावेळी चिरमुऱ्यांच्या पोत्यांच्या आड लपवून ठेवलेला ‘विमल पानमसाला’ आणि तंबाखूचा साठा आढळून आला.
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तत्काळ अन्न सुरक्षा विभागाशी संपर्क साधला. अन्न सुरक्षा अधिकारी रुपाली खापणे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली आणि त्यांच्या उपस्थितीत सर्व प्रतिबंधित माल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी बोरगाव पोलीस ठाण्यात ‘अन्न सुरक्षा व मानके अधिनियम’ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील कारवाई सुरू आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा आणि बोरगाव पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पाडली.
