सातारा : अंधाराचा फायदा घेत दबा धरून बसलेल्या बिबट्याने घराच्या अंगणातून अवघ्या दोन वर्षांच्या चिमुकल्याला उचलून नेल्याची थरारक आणि हृदयद्रावक घटना शनिवारी रात्री आठच्या सुमारास घडली. या प्राणघातक हल्ल्यात जय संदीप खंडागळे या २६महिन्यांच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. सातारा तालुक्यातील शिवथरनजीक न्हाळेवाडी येथे ही घटना घडली असून, यामुळे परिसरात तीव्र भीती आणि वनविभागाविरोधात संतापाची लाट पसरली आहे.
​
खंडागळे यांच्या घराभोवती उसाची शेती असल्याने त्यांनी सुरक्षेसाठी एक कुत्रा पाळला होता. शनिवारी रात्री वीजपुरवठा खंडित झाला होता. घरात बंदिस्त असलेल्या याच कुत्र्याची शिकार करण्यासाठी बिबट्या घरासमोर दबा धरून बसला होता. मात्र, दुर्दैवाने त्याच वेळी चिमुकला जय अंगणात आला आणि अंधाराचा फायदा घेत बिबट्याने त्याच्यावर थेट झडप घालून गळ्याला पकडले.
​
जयचा आरडाओरडा ऐकून कुटुंबीयांनी व ग्रामस्थांनी उसाच्या शेताकडे धाव घेतली. अंधारामुळे बिबट्याचा पाठलाग करणे कठीण जात होते. तरीही ग्रामस्थांनी बॅटरीच्या साहाय्याने शोधमोहीम सुरू केली. जमिनीवरील रक्ताच्या ठिपक्यांचा माग काढत ग्रामस्थ पुढे गेले. लोकांचा जमाव जवळ येत असल्याचे पाहून बिबट्याने पळ काढला. त्यानंतर ओढ्याकाठी जय रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. त्याला तातडीने सातारा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

या घटनेनंतर न्हाळेवाडीतील ग्रामस्थांनी वनविभागाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे लेखी व तोंडी कळवूनही अधिकारी ‘पाऊले तशीही आढळली नाहीत’ अशी उत्तरे देऊन टाळाटाळ करत होते, असा गंभीर आरोप नागरिकांनी केला. वनविभागाने वेळीच दखल घेतली असती, तर निष्पाप जयचा जीव वाचला असता, अशी भावना व्यक्त होत आहे. न्हाळेवाडीत तातडीने बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावावा व रात्रीची गस्त वाढवावी, अशी आक्रमक मागणी आता जोर धरत आहे.