सातारा : कोयना पाणलोट क्षेत्रातील संवेदनशील क्षेत्रातील झाडाणी (ता. महाबळेश्वर) गावातील जमीन खरेदीमध्ये गैरव्यवहार झाल्याचे सातारा अपर जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य शासनास सादर केलेल्या अहवालात नमूद केले आहे.

या खरेदीतील मुख्य सूत्रधार असलेले गुजरातचे जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी यांनी कमाल जमीन धारणा कायद्याचे उल्लंघन करत झाडाणीमध्ये तब्बल ४८ एकर ३५ गुंठे जमीन बळकावल्याचे या अहवालात म्हटले आहे. आता या प्रकरणी पुढील कारवाई ही राज्य शासनाकडून केली जाणार आहे. दरम्यान, या प्रकरणातील अनिल वसावे आणि पियुष बोंगीरवार यांच्याबाबतचा अहवाल अद्याप सादर करण्यात आलेला नाही.

कोयना पाणलोट क्षेत्रातील झाडाणी (ता. महाबळेश्वर) गावात वळवी यांच्यासह अन्य काही लोकांनी शेकडो एकर जमीन खरेदी केली आहे. या भागात जमीन खरेदी करतानाच त्याचा विकास, तिथे काही बांधकामेही संबंधितांकडून करण्यात आली. हा सर्व भाग निसर्ग आणि पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात मोडत असल्याने या मोठ्या प्रमाणावरील जमीन खरेदी, तेथील अन्य विकासकामांबाबत सर्वत्र ओरड झाली होती. ‘लोकसत्ता’नेही या प्रकरणी सलग वृत्त प्रकाशीत करत आवाज उठवला होता. यानंतर शासनाने या प्रकरणाची दखल घेत तत्कालीन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या नेतृत्वाखाली चौकशी सुरू केली होती.

यामध्ये डुडी यांनी संबंधितांना नोटीस बजावून त्यांच्या काळातच सुनावणी सुरू झाली होती. पुढे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने यांची चौकशीसाठी नियुक्ती करण्यात आली. २६ नोव्हेंबर २०२५ रोजी वळवी कुटुंबीयाना नोटीस देण्यात आली होती. त्यानंतर १५ डिसेंबर २०२५ रोजी अंतिम सुनावणी झाली. दोन्ही बाजूंची मते ऐकून माने यांनी शासनाकडे अहवाल सादर केला आहे.

माने यांनी शासनास सादर केलेल्या अहवालामध्ये झाडाणीतील जमीन खरेदीमध्ये वळवी यांच्याकडून महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियमाचे उल्लंघन झाल्याचे म्हटले आहे. पडीक जमीन धारण करण्यासाठी ५४ एकर ही कमाल मर्यादा असताना उपलब्ध कागदपत्रांनुसार वळवी यांच्या नावावर झाडाणी, उचाट व दोडाणी (ता. महाबळेश्वर) येथे एकूण ४० हेक्टर ७०.३५ आर म्हणजेच सुमारे १०२ एकर ३५ गुंठे जमीन असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे वळवी यांनी कायद्याचे उल्लंघन करत अतिरिक्त ४८ एकर ३५ गुंठे क्षेत्र जमीन बळकावल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, या प्रकरणातील अनिल वसावे आणि पियुष बोंगीरवार यांच्याबाबतचा अहवाल अद्याप सादर करण्यात आलेला नाही. वळवी यांच्या अहवालावर आता पुढील कारवाई राज्य शासनाकडून केली जाणार आहे.

झाडाणी (ता. महाबळेश्वर) गावातील जमीन खरेदीबाबतचा चौकशीचा अहवाल शासनास सादर केला आहे. यामध्ये जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी यांनी जमीन बळकवल्याचे स्पष्ट झाले आहे. या पुढील सुनावणी शासन स्तरावर होणार आहे. – मल्लिकार्जुन माने, अपर जिल्हाधिकारी, सातारा</strong>.

झाडाणी चौकशी अहवालानुसार येथील जमीन खरेदीमध्ये गैरव्यवहार सिद्ध झाले आहे. आता या अहवालानुसार अतिरिक्त ठरवलेली ४८ एकर ३५ गुंठे जमीन तातडीने सरकारजमा करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी. – सुशांत मोरे, तक्रारकर्ते, सह्याद्री वाचवा मोहिमेचे कार्यकर्ते.