सातारा : अत्यंत दुर्गम व दळणवळणापासून कोसो दूर असलेल्या महाबळेश्वर तालुक्यातील कांदाटी खोऱ्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या या महाप्रलयात आभाळ फाटल्यासारखा पाऊस पडत असून, ठिकठिकाणी झाडे आणि मोठमोठ्या दरडी कोसळल्या आहेत. परिणामी, खोऱ्यातील तब्बल १६ गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला असून येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीत परिसरातील भातशेती संपूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. मुसळधार पावसाने महाबळेश्वरच्या दुर्गम भागाची दुर्दशा झाली आहे. उचाट, शिंदी, रघुवीर घाट मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. झाडे आणि दरडी कोसळल्याने शेकडो ग्रामस्थ या खोऱ्यात अडकले आहेत.

​​जनसुविधांचा हरताळ आणि मूलभूत सुविधांची कमालीची वानवा असलेल्या या भागात वर्षानुवर्षे आपत्ती झेलत, निसर्गाच्या प्रकोपाशी दोन हात करत जगणारी इथली भाबडी जनता या परिस्थितीमुळे पुरती भेदरली आहे. ​सततच्या अतिवृष्टीमुळे उचाट–शिंदी–रघुवीर घाट मार्गावर अनेक ठिकाणी दरडी आणि झाडे कोसळल्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. तसेच काही रस्ते आणि लहान पूलही खचले आहेत. गेल्या चार दिवसांपासून संपूर्ण परिसराचा वीजपुरवठा आणि मोबाईल नेटवर्क खंडित असल्याने नागरिकांचा बाहेरील जगाशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटला आहे.

​दरम्यान, परिसरातील शिंदी, वलवण, चकदेव, आरव, पर्वत, मोरणी, म्हाळुंगे, उचाट, सालोशी, कांदाट, बन, वाघावळे, लामज, निवळी, आकल्पे आणि पिंपरी या १६ गावांतील भातशेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेक आव्हानांचा सामना करत शेतकऱ्यांनी केलेली भातलागवड पाण्याच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेली आहे, तर अनेक ठिकाणी शेतीमध्ये डोंगराचा गाळ व दगड साचल्याने संपूर्ण हंगाम धोक्यात आला आहे. मुंबईहून लामज येथे एका धार्मिक विधीसाठी (बाराव्याच्या कार्यक्रमासाठी) आलेले सुमारे ७० ग्रामस्थ तसेच पुण्यातील काही पर्यटक रघुवीर घाट व उचाट रस्तेमार्ग बंद झाल्यामुळे कांदाटी परिसरात अडकून पडले आहेत.

त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाने तातडीने रस्त्यांवरील दरडी आणि पडलेली झाडे हटवून वाहतूक पूर्ववत करावी, अशी मागणी होत आहे.
​मुसळधार पावसामुळे उचाट–शिंदी-रघुवीर घाट मार्गावरील जे रस्ते आणि लहान पूल खचले आहेत, त्यापैकी काही कामे नुकतीच पूर्ण झाली होती, तर काही अद्याप अपूर्ण आहेत. पहिल्याच मोठ्या पावसात ही कामे वाहून गेल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दर्जाबाबत स्थानिक नागरिकांमधून तीव्र प्रश्न उपस्थित केले जात आहेत. संबंधित विभागाने तातडीने याची पाहणी करून चौकशी करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
​फोटो ओळी-: शिंदी–रघुवीर घाट मार्गावर मुसळधार पावसामुळे रस्त्यावर कोसळलेले झाड व दरड.