सातारा : महाराष्ट्रातील युवा वन्यजीवसंवर्धक चिन्मय प्रकाश सावंत यांची ‘आंतरराष्ट्रीय निसर्गसंवर्धन संघ’(इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचर), ‘प्रजाती जतन आयोग’(स्पीशीज् सर्व्हायव्हल कमिशन)’ अंतर्गत येणाऱ्या ‘तरस (हाइना) स्पेशालिस्ट ग्रुप’च्या सदस्यपदी अधिकृत नियुक्ती झाली आहे. सातारा जिल्ह्यातील माणदेश परिसरातील पट्टेरी तरस आणि खुल्या गवताळ परिसंस्थांच्या संवर्धनासाठी त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची ही आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतलेली दखल आहे.

चिन्मय सावंत गेल्या काही वर्षांपासून माणदेशात स्थानिक ग्रामस्थांच्या सहभागातून समुदायआधारित संवर्धनाचे प्रभावी मॉडेल राबवत आहेत. त्यांनी जैवविविधतेचे दस्तऐवजीकरण, अधिवास संरक्षण, वन्यजीव निरीक्षण आणि जनजागृतीद्वारे मानवी समाज व वन्यजीवांतील सहअस्तित्व मजबूत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. या जागतिक नियुक्तीमुळे जगभरातील १३ देशांतील २० निवडक संशोधक व तज्ज्ञांमध्ये स्थान मिळवणारे चिन्मय सावंत हे भारतातील केवळ दोन सदस्यांपैकी एक ठरले आहेत.

‘आंतरराष्ट्रीय निसर्गसंवर्धन संघा’चा (आययूसीएन) हा समूह जगभरातील तरसांच्या प्रजातींचे संरक्षण, वैज्ञानिक संशोधन, संवर्धन धोरणांची आखणी आणि जागतिक स्तरावर माहितीच्या देवाणघेवाणीसाठी कार्यरत आहे.

ही संधी जागतिक स्तरावर योगदान देण्यासोबतच माणदेशातील खुल्या परिसंस्था आणि पट्टेरी तरसांच्या संरक्षणासाठी माझी बांधिलकी अधिक दृढ करणारी आहे.- चिन्मय सावंत, सदस्य, आंतरराष्ट्रीय निसर्गसंवर्धन संघ (प्रजाती जतन आयोग)