कराड : सातारा जिल्ह्यात मान्सून लांबल्याने भीषण जलटंचाईचे संकट गडद झाले असून, तापमान चाळीच्या समीप असताना, केवळ सहा दिवसांत पाणी टँकरची संख्या ११ने वाढून १०८ वर पोहोचली आहे. ‘एल निनो’ची प्रचंड धास्ती, कमालीचा उकाडा आणि मोसमी पावसाचा पत्ताच नसल्याने टंचाईग्रस्त जनता आणि बळीराजा हवालदिल झाला आहे.

खरिपाच्या पेरण्यांसाठी शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसला आहे, तर दुसरीकडे तहानलेल्या गावांना पाणी पुरवताना प्रशासकीय यंत्रणेची दमछाक होत आहे. पाणी टँकरची संख्या सतत वाढणार असल्याचे चित्र आहे. यंदाचा ‘एल निनो’ आतापर्यंतचा सर्वात तीव्र ठरणार असून, पाऊसमान घटण्याचे स्पष्ट संकेत हवामान खात्याने दिले आहेत.

आधीच सर्वात तप्त उन्हाळ्यामुळे जमिनीतील ओलावा संपला असून, भूजलस्तर कमालीचा घसरलेला आहे. आहे. गेल्या चार- साडेचार महिन्यांच्या कडक उन्हाळ्यामुळे जलसाठे तळाशी असताना आता ‘मान्सून’चे आगमन आणि त्याची सरासरी अनिश्चित असून, या पावसाचे पहिले सत्र कोरडे गेल्यास पाणीबाणीची परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती आहे. सध्या पिण्याच्या पाण्यासह पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. तर उपलब्ध पाणी दूषित होण्याचे नवे संकट उभे ठाकल्याने शासकीय यंत्रणाही चिंतेत आहे.

(‘एल निनो’, भूजलस्तराचे आव्हान)

हवामान बदलामुळे जून महिन्यात पावसाने ओढ दिली आहे. यंदा भूजलस्तरही कमालीचा घटला असून, पारंपरिक जलस्रोत आटले आहेत. जर पाऊस असाच लांबणीवर पडला, तर खरीप पेरण्यांचे काय, असा प्रश्न उपस्थित होताना, प्रशासनाला चारा छावण्या सुरू करण्याची वेळ येण्याची शक्यता आहे.

(माणदेशचा ‘टँकरवाडा’!)

जिल्ह्यातील एकूण टंचाईपैकी निम्मी टंचाई एकट्या दुष्काळी माण तालुक्यात आहे. १०८ टँकर्सपैकी सर्वाधिक ५० टँकर केवळ माणमधील ४८ गावे आणि २८५ वाड्यावस्त्यांवरील नागरिकांची आणि जनावरांची तहान भागवत आहेत. त्याखालोखाल खटाव तालुक्यात ३० गावे, ५८ वाड्यावस्त्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून आहेत. माणमधील बाधित ६७ हजार नागरिक आणि ९२ हजार जनावरे टँकरवर अवलंबून आहेत.

(टंचाईची भीषण आकडेवारी)

भूजल पातळी : सरासरी ९ इंचाने खालावून ७.२९ मीटरवर.
जलटंचाई क्षेत्र : ११६ गावे आणि ३९१ वाड्यावस्त्या.
टंचाईग्रस्त : १,४८,३१३ नागरिक आणि १,३३,४२२ जनावरे.
पाणी टँकरची संख्या : १०८
अधिग्रहण: ४४ विहिरी, २३ कुपनलिका शासकीय यंत्रणेच्या ताब्यात