सातारा: शहरातील अत्यंत गजबजलेल्या मोती चौक परिसरात रविवारी दुपारी वाहन काढण्याच्या आणि पार्किंगच्या कारणावरून दोन दुचाकी चालकांमध्ये तुफान मारामारी झाली. भररस्त्यात झालेल्या या गोंधळामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेत साताऱ्यातील एका प्रसिद्ध मिठाई व्यावसायिकाला मारहाण करण्यात आली असून, या घटनेची चित्रफितही (व्हिडिओ) समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल झाला आहे. ही मारामारी सोडवण्याऐवजी बघायचीच मोठी गर्दी झाल्याने वातावरण आणखी चिघळले.
मिळालेल्या माहितीनुसार, सातारा शहरातील मध्यवस्तीत सतत गजबजलेल्या मोती चौक परिसरात दुचाकी उभी करण्यावरून दोन चालकांमध्ये शाब्दिक बाचाबाची सुरू झाली. या किरकोळ वादाचे रूपांतर पाहता पाहता हिंसक हाणामारीत झाले. एका दुचाकी चालकाने संतापाच्या भरात साताऱ्यातील नामांकित मिठाई व्यावसायिकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. अचानक सुरू झालेल्या या मारामारीमुळे परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमली. या घटनेदरम्यान संबंधितांसोबत असलेल्या महिला प्रचंड घाबरून गेल्याचे पाहायला मिळाले. त्याही भांडण सोडवण्याचा प्रयत्न करत होत्या. मात्र त्यांचे प्रयत्नही कमी पडत होते.
घटनेची माहिती मिळताच जवळच तैनात असलेले वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी सुहास पवार आणि रमेश शिखरे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी प्रसंगावधान राखून दोन्ही गटांना तत्काळ वेगळे केले आणि वाद शांत केला. पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केल्याने पुढील मोठा अनर्थ टळल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अतिक्रमण आणि नियमबाह्य पार्किंगमुळे वाहनचालकांमध्ये रोजच वादावादी होत असते. त्यामुळे नियमबाह्य पद्धतीने जागा अडविणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली.
मोती चौक हा सातारा शहरातील अत्यंत वर्दळीचा आणि मध्यवर्ती भाग मानला जातो. या भागातील अनेक दुकानदारांनी दुकानांसमोर लोखंडी जाळ्या आणि इतर अडथळे उभे करून रस्ते आणि पदपथ व्यापले आहेत. यामुळे वाहनचालकांना पार्किंगसाठी सतत अडचणींचा सामना करावा लागतो. या रोजच्या त्रासाला वैतागलेल्या सातारकरांनी, पालिकेच्या अतिक्रमण विभागाने आणि वाहतूक पोलिसांनी कोणत्याही राजकीय वा स्थानिक दबावाला बळी न पडता अशा नियमबाह्य जागा अडविणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी जोरदार मागणी केली आहे.
