सातारा: फलटण तालुक्यातील खामगाव येथे घराबाहेर पडलेल्या विद्युत वायरमधील प्रवाहामुळे विजेचा धक्का लागून एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. एकमेकांचे प्राण वाचवण्याच्या प्रयत्नात संपूर्ण कुटुंबच काळाच्या पडद्याआड गेल्याने खामगाव परिसरासह संपूर्ण फलटण तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
किसन पिसुरड्या शिंदे (वय ४८), गंगुबाई पिसुरड्या शिंदे (वय ४६), सचिन पिसुरड्या शिंदे (वय २६) आणि आरती पिसुरड्या शिंदे (वय २२) अशी एकाच वेळी मृत्यू पावलेल्या दुर्दैवी कुटुंबीयांची नावे आहेत.
खामगाव येथील खाजगी इंग्लिश मीडियम शाळेजवळ शिंदे कुटुंब वास्तव्यास आहे. नेहमीप्रमाणे बुधवारी पहाटे साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास कुटुंबातील प्रमुख किसन शिंदे हे घराबाहेर जात होते. मात्र, घराबाहेर एका विद्युत वायरमधून उतरलेल्या वीजप्रवाहाला अंधारात किंवा नजरचुकीने किसन यांचा या वायरला स्पर्श झाला आणि त्यांना विजेचा जोरदार झटका बसला.
किसन शिंदे यांना विजेचा धक्का लागून ते विव्हळत असल्याचे पाहताच, त्यांना वाचवण्यासाठी पत्नी गंगुबाई, मुलगा सचिन आणि मुलगी आरती हे एकापाठोपाठ एक धावून आले. मात्र, वीजप्रवाह इतका तीव्र होता की, एकमेकांना वाचविण्याच्या प्रयत्नात चौघेही एकमेकांना चिकटले. काही सेकंदांतच या संपूर्ण कुटुंबाचा जागीच दुर्दैवी अंत झाला.
या घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी महादेव पिसे, ओंबासे आणि अडसूळ यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी फलटण उपजिल्हा रुग्णालयात पाठवले आहेत.
घराबाहेरील वायरमध्ये विद्युत प्रवाह नेमका कसा आणि कुठून आला? महावितरणचा निष्काळजीपणा याला कारणीभूत आहे का? या सर्व बाजूंचा सखोल तपास फलटण ग्रामीण पोलीस करत आहेत. एकाच घरातील चार जण अचानक गेल्याने गावात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.
