सातारा : स्थानिक गुन्हे शाखेने लोणंद (ता. खंडाळा) बसस्थानक परिसरात सापळा लावून अवैध पिस्टल विक्रीसाठी आलेल्या पाच जणांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून तीन देशी बनावटीची पिस्टल, पाच जिवंत काडतुसे, एक मोटार व सहा मोबाईल हॅन्डसेट असा एकूण १२ लाख ६७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक तुषार दोशी सातारा व अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्रे बाळगणारे व विक्री करणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे व रोहित फार्णे यांच्या अधिपत्याखाली वाई येथील काहीजण मोटार (एम एच १२ एन इ ९२१०) मधून लोणंद बसस्थानक परिसरात देशी पिस्टल व काडतुसे विक्रीसाठी येणार असल्याच्या खात्रीशीर माहितीच्या आधारे सापळा लावून संशयिताना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये निखील शिवाजी मोरे (गंगापुरी, वाई), आयुष चंद्रकांत अडसुळ (रविवार पेठ, वाई), यश बबन चव्हाण (बावधन, ता. वाई), नितीन दत्ता वाडकर (बावधन, ता. वाई) आणि सनी काशिनाथ भोसले (खानापूर, ता. वाई) यांचा समावेश आहे. त्यांच्या विरोधात लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्वजण अभिलेखावरील गुन्हेगार आहेत.
ही कारवाई पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, रोहित फार्णे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, परितोष दातीर तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. या यशस्वी कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी संबंधित अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन केले आहे.
इंजेक्शनची अवैध विक्री उघड; १.५४ लाखांचा मुद्देमाल जप्त, एकाला अटक…
व्यक्तीच्या जीवितास धोका किंवा आरोग्यास गंभीर इजा होऊ शकणाऱ्या इंजेक्शनची अवैधरित्या विक्री करणाऱ्या एका इसमास सातारा स्थानिक गुन्हे शाखा पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले. या कारवाईत तब्बल १ लाख ५४ हजार ८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी शिवराज पंकज कणसे (रा. अजिंक्य बाजार चौक, शाहूनगर, गोडोली, सातारा) याला अटक करण्यात आली असून, त्याच्याविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या सूचनेनुसार, पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी पथक गठित केले होते. एकजण शाहू चौक ते चारभिंती मार्गावर दुचाकीवरून इंजेक्शन विक्रीसाठी फिरत असल्याची माहिती मिळाल्याने पथकाने बंद सापळा लावून संशयितास ताब्यात घेतले.
अंगझडतीत त्याच्याकडे १३ बाटल्या आढळून आल्या. हे इंजेक्शन खरेदीचे बिल, डॉक्टरांची चिठ्ठी किंवा विक्री, साठवण परवाना नसल्याचे आरोपीने कबूल केले. हे इंजेक्शन शरीरसौष्ठव (बॉडी बिल्डिंग)साठी वापरले जात असून, प्रत्येकी दोन हजार रुपयांना विक्री करत असल्याचेही त्याने सांगितले. त्याच्याकडून इंजेक्शनच्या १३ बाटल्या, दुचाकी, मोबाईल असा एक लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या कारवाईत पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, रोहित फाणे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सहभाग घेतला. अंमली व प्रतिबंधित औषधांच्या अवैध विक्रीविरोधात पोलिसांची कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिला आहे.

