सातारा : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर सर्वत्र पडलेले खड्ढे, महामार्गाची चालू असलेली कामे यामुळे प्रवाशी त्रस्त असताना टोल वसुलीच्या विरोधात साताऱ्यातील १९ नागरी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. महामार्ग आणि सेवा रस्त्यांची दुरवस्था झाली असतानाही टोलवसुली बंद करण्याची मागणी करत या संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
ज्ञानविकास मंडळाचे कार्यवाहक प्रसाद चाफेकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले. सातारा ते पाचवडदरम्यान सेवा रस्त्यांवर पडलेले भलेमोठे खड्डे, गायब झालेले बॅरिकेड्स आणि निकृष्ट डांबरीकरणामुळे निर्माण झालेले उंचवटे यामुळे वाहनचालकांचा जीव धोक्यात आहे, याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.
या आंदोलनात जिल्हा परिषद सदस्य राजू शेळके, डॉ. कर्मवीर मार्तंडराव सूर्यवंशी, ‘चर्चा फाउंडेशन’च्या अध्यक्षा डॉ. हेमलता हिरवे यांच्यासह निमा, चार्टर्ड अकाउंटंट असोसिएशन व इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉ. अशोक सूर्यवंशी आदी प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी आंदोलकांच्या मागण्यांची गांभीऱ्याने दखल घेत, हे निवेदन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे पाठवून प्रशासकीय पातळीवर तातडीने पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे.
आंदोलकांच्या मागण्या
- हलक्या वाहनांसाठी १० रुपये, चारचाकींसाठी २० रुपये, तर अवजड वाहनांसाठी ३० रुपयेच टोल आकारण्यात यावा.
- राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसोबत तातडीने बैठक घेऊन दुरुस्तीचा मार्ग मोकळा करावा.
