सातारा : खासगी वाहनांना उच्च सुरक्षा वाहन क्रमांक पाटी (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) नसेल तर तातडीने दंडात्मक कारवाई करणाऱ्या प्रशासनाचा स्वतःच्याच वाहनांबाबतचा दुटप्पीपणा उघड झाला आहे. २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना ‘एचएसआरपी’ बसविण्याची अंतिम मुदत ३० जून रोजीच संपली आहे.
मात्र, मुदत उलटूनही सातारा जिल्ह्यातील अनेक शासकीय वाहनांवर अद्याप जुन्याच नंबर प्लेट असल्याचे समोर आले आहे. या नियम उल्लंघणाची गंभीर दखल घेत सातारा प्रादेशिक परिवहन कार्यालयाने जिल्ह्यातील तब्बल ३७ शासकीय कार्यालयांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत.
नियमांचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाई का करू नये, अशी विचारणा या नोटिशीद्वारे करण्यात आली आहे. तसेच, संबंधित कार्यालयांनी तातडीने ‘ऑनलाइन’ नोंदणी करून वाहनांना ‘एचएसआरपी’ बसवून घ्यावी, असे आदेश देण्यात आले आहेत.
आतापर्यंत किती वाहनांना ही वाहन क्रमांक पाटी बसवण्यात आली, किती वाहनांची प्रक्रिया सुरू आहे आणि किती प्रलंबित आहेत, याचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश ‘आरटीओ’ने दिले आहेत. आरटीओ आणि पोलिसांकडून सर्वसामान्य वाहनधारकांवर थकीत दंडासह कडक कारवाई केली जाते. मग शासकीय यंत्रणेलाच यातून सूट का, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. नियम सर्वांसाठी समान असायला हवेत. केवळ नोटिसा बजावण्याचा फार्स न करता ‘आरटीओ’ने शासकीय वाहनांवर प्रत्यक्ष दंडात्मक कारवाई करून दाखवावी, तरच प्रशासनावरील विश्वास टिकून राहील, अशी भावना व्यक्त होत आहे.
मुदत संपल्यानंतर आरटीओ व पोलिसांच्या भरारी पथकांनी आतापर्यंत सुमारे ३६५ खासगी वाहनांवर कारवाई केली आहे. शासकीय यंत्रणांनी स्वतः नियमांचे पालन करून जनतेसमोर आदर्श ठेवणे गरजेचे आहे. यापुढे खासगी असो वा शासकीय, ‘एचएसआरपी’ नसलेल्या प्रत्येक वाहनावर भेदभाव न करता कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा परिवहन विभागाने दिला आहे.
अनेक शासकीय वाहने ही २०१९ पूर्वी नोंदविलेली आहेत. या वाहनांना उच्च सुरक्षा वाहन क्रमांक पाटी (एचएसआरपी) असणे गरजेचे आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांना लवकरात लवकर करून घेण्याबाबत कळविले आहे. जिल्ह्यातील अशा ३७ शासकीय कार्यालयांना ‘आरटीओ’ची नोटीस पाठवली आहे. दशरथ वाघुले, प्रादेशिक परिवहन अधिकारी, सातारा.
