स्वराज्यविस्तारक छत्रपती शाहू महाराज साहित्यनगरी (सातारा) : सातारा जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळे-संस्कृती, साहित्यिकांचा त्यांच्या साहित्यासह आढावा यावरील प्रदर्शने, साहित्य मंडपातील लक्षवेधी मांडणी; सहभागी झालेली ग्रामीण-शहरी अशी मोठी गर्दी, त्यातील तरुणाईचा मोठा सहभाग हे सातारा साहित्य संमेलनाचे वैशिष्ट्य ठरत आहे. छत्रपती थोरले शाहू महाराज साहित्य नगरीमध्ये याचे पदोपदी दर्शन घडत आहे.
साताऱ्यात तब्बल ३२ वर्षांनी मराठी साहित्य संमेलन होत असल्याने त्याचे सुरुवातीपासून मोठे आकर्षण होते. याच्या तयारीपासूनच ते प्रत्यक्ष सोहळ्यापर्यंत संमेलन हे जिल्ह्यात सर्वत्र चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. संमेलनास काल ग्रंथदिडीने सुरुवात झाली. या ग्रंथदिडीपासूनच शहरात उत्साह संचारला होता. या ग्रंथदिडीत शालेय विद्यार्थ्यांपासून ते शहरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आज उद्घाटनाच्या दिवशी या गर्दीने मोठी झेप घेतली. सातारा शहरासोबतच जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रसिकांनी शुक्रवारी संमेलनस्थळी हजेरी लावली. यात ग्रामीण भागातून आलेले साहित्यप्रेमी हे संमेलनातील भाषणे ऐकणे, हा सोहळा अनुभवणे यासाठी प्रामुख्याने आल्याचे दिसले. गावागावांतून एसटी बसमधून हे असे जथ्थेच्या जथ्थे साताऱ्यातील संमेलनस्थळी धाव घेतानाचे चित्र शुक्रवारी दिसत होते. आलेल्या या गर्दीत तरुणाईचा सहभाग मोठा असल्याचे दिसून येत होते.
संमेलननगरी सजली
श्रीमंत छत्रपती थोरले शाहू महाराज साहित्य नगरीत साकारलेल्या संमेलनाच्या मुख्य मंडपासह उपमंडपांमध्ये साताऱ्याचे विविधांगी दर्शन घडवणाऱ्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये अजिंक्यतारा किल्ल्यापासून सातारा जिल्ह्यातील गडांचे दर्शन, साताऱ्याच्या ऐतिहासिक पाणीपुरवठा व्यवस्था, रामदास ऐतिहासिक घळी तसेच वेगवेगळ्या स्थळांचा आणि ठिकाणांची माहिती देणारी स्थलचित्रे याचे स्वतंत्र दालन उभे करण्यात आले आहेत.
सातारा जिल्ह्याला साहित्यिकांची मोठी परंपरा आहे. या परंपरेचे दर्शन संमेलननगरीतील मुख्य आकर्षण ठरत आहे. कवि गिरीश, बा. सी. मर्ढेकर, ग. दी. माडगुळकर, व्यंकटेश माडगुळकर, यशवंतराव चव्हाण, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, इंदिरा संत अशा अनेक नामवंत साहित्यिकांची छायाचित्रे, त्यांची माहिती, त्यांच्या लेखनातील विविध पैलू, योगदान यांची माहिती या प्रदर्शनातून मांडण्यात आलेली आहे.
प्रदर्शनात ग्रंथ विक्रीचे दालनही अनेकांचे आकर्षण ठरत आहे. राज्य आणि परराज्यातून दोनशेहून अधिक पुस्तक विक्रीचे स्टॉल या ग्रंथ विक्री दालनात लागलेले आहेत. या स्टॉलभोवती संमेलनासाठी आलेल्या रसिकांची मोठी गर्दी होताना दिसत आहे. अनेक पुस्तक विक्रेत्यांनी संमेलनासाठी विविध पुस्तकांच्या विक्रीवर आकर्षक सवलतही जाहीर केलेली आहे. साहित्यप्रेमी रसिक त्यातही तरुण मुले या पुस्तकांच्या विश्वात खरेदीबरोबरच विविध विषयांची ओळख करून घेण्यातही रंगून गेलेली दिसत आहे.
