Sajjangarh Satara / सातारा : राष्ट्रसंत श्री समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या आणि त्यांचे समाधिस्थळ असलेल्या सज्जनगडावर माघ महिन्यातील गुरू प्रतिपदेपासून सुरू झालेल्या दासनवमी महोत्सवाचा मुख्य सोहळा आज हजारो भाविकांच्या उपस्थितीत साजरा झाला. या वेळी ‘जय जय रघुवीर समर्थ’च्या जयघोषाने सगळा सज्जनगड भारावून गेला.

सज्जनगडावर दर वर्षी दासनवमी या त्यांच्या पुण्यतिथीवेळी उत्सव केला जातो. माघ महिन्यातील गुरुप्रतिपदेपासून सुरू झालेल्या या महोत्सवात गडावर रामनामाचा गजर सुरू होता. अनेक नामवंतांचे कीर्तन, प्रवचन, भजन, गायनसेवा गडावर सुरू होती.

दरम्यान, बुधवारी दासनवमीला या महोत्सवाचा मुख्य सोहळा होता. पहाटे दोन वाजता समाधी मंदिरात काकडारती, त्यानंतर पहाटे चार वाजता श्री समर्थ समाधी महापूजा, सकाळी साडेसहा वाजता सज्जनगड गावातून सांप्रदायिक भिक्षा असे कार्यक्रम पार पडले. विशेष पूजेमध्ये समर्थांची समाधी अनेक सुवासिक गुलाब, चाफा, मोगरा, शेवंती, जास्वंद फुलांनी सुशोभित करण्यात आली होती. तसेच समाधीच्या वरील बाजूस मोगऱ्याच्या फुलांच्या माळा लक्ष वेधून घेणाऱ्या होत्या. समर्थ समाधीवरील श्रीराम मूर्तीलाही फुलांची, तसेच पुष्पहार याची विशेष सजावट करण्यात आली होती.

समाधी मंदिरामध्ये दर्शनासाठी रांगेने समर्थ भक्तांना शिस्तबद्धपणे सोडण्यात येत होते. सांप्रदायिक भिक्षेमध्ये समर्थ रामदास स्वामींचे वंशज, तसेच महंत, मठपती, मानकरी उपस्थित होते. नंतर सकाळी साडेदहा वाजता आरती, छबीना, मानाच्या १३ प्रदक्षिणा झाल्या. प्रदक्षिणेवेळी वेळी रामदास स्वामी संस्थान, श्री समर्थ सेवा मंडळचे पदाधिकारी, मानकरी, तसेच हजारो समर्थभक्त सहभागी होत त्यांच्याकडून ‘जय जय रघुवीर समर्थ’चा जयघोष सुरू होता.

मंदिर प्रदक्षिणेनंतर समर्थभक्त सुरेशबुवा सोन्ना रामदासी यांनी सांगितलेली श्री समर्थ निर्वाण कथा ऐकण्यासाठी हजारो समर्थभक्तांनी गर्दी केली होती. यानंतर संस्थान आणि समर्थ सेवा मंडळाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. रात्री साडेनऊ वाजता कीर्तनसेवा पार पडली. दरम्यान, गेल्या नऊ दिवसांपासून सुरू असलेल्या या महोत्सवाची गुरुवारी सकाळी लळिताच्या कीर्तनाने या यात्रेचा समारोप होणार असल्याची माहिती समर्थ रामदास स्वामी संस्थानाचे विश्वस्त श्री स्वामी, समर्थ सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष योगेशबुवा रामदासी यांनी दिली.

दरम्यान, श्री समर्थ सेवा मंडळातर्फे सातारा शहरातील समर्थसदन, सांस्कृतिक केंद्र येथे सुरू असलेल्या ग्रंथराज दासबोध पारायणाची आज सांगता करण्यात आली. तसेच या ठिकाणी असणाऱ्या श्री समर्थांच्या मूर्तीला विशेष अभिषेक व पूजा करून सुशोभित करण्यात आले होते. दासनवमी उत्सवासाठी सातारा आगारातर्फे एसटी बसच्या विशेष यात्रा फेऱ्या सोडण्यात आल्या होत्या. उद्या महोत्सवाची सांगता झाली, तरी महाशिवरात्रीपर्यंत परिसरातील अनेक गावांतील ग्रामस्थ दर्शनासाठी मोठ्या संख्येने येत असतात.