सातारा : साताऱ्यातील एका नावलौकिक असलेल्या शाळेतील वसतिगृहात २४ मुलांवर काळजी वाहकाकडून (केअर टेकर) गैरवर्तन करण्याचा प्रयत्न झाला आहे. विद्यार्थ्यांच्या चौकशीमध्ये ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी संबंधित व्यक्तीविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक केली आहे. त्याला सोमवारी न्यायालयात हजर केले असता त्याची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे. पुढील तपास सातारा शहर पोलीस करत आहेत.

सातारा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही शाळा राज्यात प्रसिद्ध आहे. शाळेत इयत्ता सहावी ते बारावीपर्यंतचे शिक्षण दिले जाते. या शाळेतील मुले निवासी आहेत. या मुलांच्या वसतिगृहासाठी संबंधित काळजी वाहकाची (केअर टेकर) नेमणूक करण्यात आलेली आहे. या काळजी वाहकानेच वसतिगृहातील २४ मुलांसोबत वेळोवेळी गैरकृत्य केले. हे करताना तो मुलांना मारहाण करत धमकावत असे. नुकताच तीन मुलांसोबत त्याने असाच प्रकार केला.

या वेळी संबंधित मुलांना त्याने मारहाण करत धमकावले. यामुळे घाबरलेल्या मुलांनी शाळा प्रशासनाकडे तक्रार केली. यातून चौकशी केल्यावर अन्य मुलांसोबतही असाच प्रकार झाल्याचे पुढे आले. यातून सर्वच मुलांना विश्वासात घेत चौकशी केली असता २४ मुलांसोबत असे गैरवर्तन, मारहाण, धमकावण्याचा प्रकार घडल्याचे उघड झाले आहे. या गंभीर घटनेची दखल घेत शाळा प्रशासनाने सातारा शहर पोलीस ठाण्यात संबंधित काळजी वाहकाविरुद्ध तक्रार दिली आहे. तसेच हंगामी स्वरूपाच्या नोकरीवर असलेल्या या कर्मचाऱ्यास तातडीने कामावरून काढून टाकण्यात आले आहे.

दरम्यान सातारा शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियमअन्वये (पोक्सो) संबंधित कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली. त्याला सोमवारी न्यायालयात हजर केले असता त्याची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे. पुढील तपास सातारा शहर पोलीस करत आहेत.

एका शाळेतील वसतिगृहातील हंगामी कर्मचाऱ्याकडून मुलांशी गैरवर्तन, मारहाण, धमकावण्याचा प्रयत्न झाला आहे. या प्रकरणी सुरुवातीला तीन पालकांनी शाळेकडे तक्रारी केल्या होत्या. याअंतर्गत चौकशी केल्यावर अशा प्रकारे २४ मुलांसोबत गैरवर्तन झाल्याचे उघड झाले आहे. संबंधित कर्मचाऱ्यास अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याची जामिनावर मुक्तता केली आहे. – तुषार दोशी, पोलीस अधीक्षक, सातारा