सातारा : कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) गैरवापर करून सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे छायाचित्र एका नर्तिकेसोबत जोडून (मॉर्फ करून) समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे साताऱ्यात शिवेंद्रसिंहराजेंच्या समर्थकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे जनसंपर्क अधिकारी अमर मोकाशी यांनी या संदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार प्रतीक थोरात, ‘देशभक्त जेन झी’, सोनाली देशमुख, हरी शिंदे आणि ‘माणदेश प्राईम न्यूज’ या फेसबुक पेज व समाजमाध्यम खात्यांच्या धारकांविरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रतीक थोरात या नावाच्या फेसबुक पेजवरून शिवेंद्रसिंहराजेंचे मूळ छायाचित्र डिजिटल संपादन, मॉर्फिंग आणि एआय अॅपच्या माध्यमातून बदलण्यात आले. दहीहंडीच्या कार्यक्रमात एक नर्तिका नाचत असून मंत्री महोदय तिच्याकडे पाहत असल्याचे भासणारे हे बनावट छायाचित्र तयार करण्यात आले. त्यावर ‘कॅप्शन सुचवा’ असा उल्लेख करून ते इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर प्रसारित करण्यात आले. हे छायाचित्र व्हायरल होताच नेटकऱ्यांनी मंत्र्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली.
या अपप्रचाराची माहिती मिळताच माजी नगराध्यक्ष अमोल मोहिते, नगरसेवक अविनाश कदम, धनंजय जांभळे, अॅड. व्ही. व्ही. किर्दत आणि अमर मोकाशी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास थेट पोलीस ठाण्यात धडकले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांची भेट घेऊन संशयितांवर कठोर कारवाईची मागणी केली. दरम्यान, संतप्त समर्थकांनी छायाचित्र प्रसारित करणाऱ्यांना फोनवरून जाब विचारत ते तातडीने हटवण्यास भाग पाडले.
सायबर पोलिसांकडून तपास सुरू : पोलीस अधीक्षक
शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मॉर्फ केलेल्या छायाचित्राबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण तांत्रिक स्वरूपाचे असल्याने सायबर पोलिसांना तपासाचे आदेश दिले आहेत. गुगल आणि मेटा (फेसबुक, इन्स्टाग्राम) या कंपन्यांशी संपर्क साधून सखोल तपास केला जाईल आणि दोषींवर कडक कारवाई होईल,- निखिल पिंगळे,पोलीस अधीक्षक, सातारा</strong>
