सातारा:  ​पवित्र श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी सातारा जिल्ह्यातील वाई येथील कृष्णा नदीचा गणपती घाट आणि सातारा जवळील क्षेत्र माहुली व संगम माहुलीचा कृष्णा-वेण्णा संगम परिसर भाविकांच्या प्रचंड उत्साहाने दुमदुमून गेला. परंपरेनुसार वाई तालुक्यासह परिसरातील विविध गावांचे ग्रामदैवत, पालख्या आणि काठ्या पवित्र स्नानासाठी कृष्णा घाटावर एकत्र आल्याने संपूर्ण परिसराला मोठ्या यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.

​भल्या पहाटेपासूनच ‘हर हर महादेव’ च्या जयघोषात ग्रामदैवतांचे घाटावर आगमन सुरू झाले. यामध्ये प्रसिद्ध तीर्थक्षेत्र मांढरदेव येथील श्री काळेश्वरी देवीची पालखी मोठ्या दिमाखात आणि हजारो भाविकांच्या लवाजम्यासह कृष्णा नदीकाठी दाखल झाली. भाविकांनी उधळलेला गुलाल, ढोल-ताशांचा कडकडाट आणि लेझीमच्या तालावर रंगलेले डाव यामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते.

​घाटावर पोहोचल्यानंतर परंपरेप्रमाणे ग्रामदैवतांच्या मूर्तींना व मुखवट्यांना कृष्णा नदीच्या पवित्र जलात स्नान घालण्यात आले. त्यानंतर विधिवत अभिषेक आणि पूजा-अर्चा करण्यात आली. देवाच्या दर्शनासाठी आणि स्नानाचा सोहळा डोळ्यांत साठवण्यासाठी हजारो भाविकांनी घाटावर अलोट गर्दी केली होती.

बावधन येथील भैरवनाथ देवाची पालखी व परिसरातील वाड्यांवरील ग्रामदेवतांच्या पालख्या ग्रामदैव त्यांच्या पालख्या वाकेश्वर येथे स्नानासाठी कृष्णा नदीकाठी आल्या होत्या.

माहुलीच्या संगमावरही उत्सवाचे वातावरण

दुसरीकडे, सातारा शहराजवळील क्षेत्र माहुली आणि  संगम माहुली येथे कृष्णा आणि वेण्णा नदीच्या पवित्र संगमावर सातारा परिसरातील अनेक गावांमधील ग्रामदैवतांच्या पालख्या स्नानासाठी आणल्या गेल्या होत्या. येथेही शेवटच्या सोमवारी हजारो भाविकांनी हजेरी लावत दर्शन घेतले. या निमित्ताने गावोगावचे नागरिक, नातेवाईक घाटावर एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. वर्षानुवर्षांची धार्मिक आणि सामाजिक परंपरा जपत सातारकरांनी श्रावण महिन्याला मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात निरोप दिला.

शेवटच्या श्रावणी सोमवारी ‘हर हर महादेव’चा गजर; सातारा जिल्ह्यात शिवालयांमध्ये भाविकांची गर्दी

श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी सातारा जिल्ह्यातील कोटेश्वर, यवतेश्वर, पाटेश्वर आणि वाईच्या काशीविश्वेश्वर मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. मोळेश्वर येथील पांडवकालीन शिव-पार्वती मंदिर व उरूल येथील स्वयंभू मंदिरात महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. पावसाचे सावट दूर होऊन समृद्धी यावी, असे साकडे घालत शिवपिंडीवर विधीवत अभिषेक करण्यात आला.