सातारा : सामाजिक वनीकरण विभागाच्या वृक्षलागवड योजनेंतर्गत खटाव आणि माण तालुक्यात करण्यात आलेल्या ११ कोटी २१ लाख ५३ हजार २०१ रुपयांच्या वृक्षलागवड कामांच्या चौकशीच्या आदेशास वरिष्ठ अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली आहे. वडूज येथील प्रथमवर्ग न्यायिक दंडाधिकाऱ्यांनी पोलिसांना या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते. या विरोधात साताऱ्याच्या सामाजिक वनीकरण विभागीय अधिकाऱ्यांनी न्यायालयात दाद मागितली होती.
दादासाहेब गोरख चव्हाण यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीमध्ये म्हटले आहे, की राज्यात २०१७ ते २०२२ या कालावधीत मिळालेल्या निधीतून ३३ कोटी वृक्षलागवड, तसेच १३ कोटी वृक्षलागवड योजनेंतर्गत विविध उपक्रम राबवण्यात आले. खटाव तालुक्यात या योजनांच्या अंमलबजावणीमध्ये प्रत्यक्ष वृक्षलागवड न करता केवळ कागदोपत्री लागवड दाखवणे, त्यावरील खर्च रक्कम लुबाडण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासाठी बनावट नोंदवही, कागदपत्रे, धनादेश व मजूर अहवाल तयार करून सरकारी निधीचा अपहार करण्यात आल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.
दरम्यान, याबाबत माहिती मागवूनही ती न मिळाल्याने तक्रारदाराने आधी पोलीस ठाणे आणि पोलीस अधीक्षकांकडे धाव घेतली होती. मात्र, कोणतीही कारवाई न झाल्याने अखेर न्यायालयात दाद मागितली आहे. यावर वडूज येथील प्रथमवर्ग न्यायिक दंडाधिकाऱ्यांनी याप्रकरणी सामाजिक वनीकरण अधिकाऱ्यांवर ठपका ठेवत चौकशीचे आदेश दिले होते.
या चौकशीच्या आदेशामुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. मात्र, सामाजिक वनीकरण विभागाच्या विभागीय अधिकारी रेश्मा सुधीर मोरे-व्होरकाटे यांनी या आदेशाविरोधात वरिष्ठ अतिरिक्त जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली. तक्रारीतील सर्व आरोप बिनबुडाचे व पुराव्याशिवाय असल्याचे सांगत त्यांनी चौकशी आदेशाला स्थगिती देण्याची विनंती केली. यावर अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने वडूज न्यायालयाच्या चौकशी आदेशाला तात्पुरती स्थगिती दिली.
वरिष्ठ अधिकाऱ्यांवर आरोपांचा ठपका
या प्रकरणातील संशयितांमध्ये मुख्य वनसचिव वेणू गोपाल रेड्डी यांच्यासह हनुमंत धुमाळ, रंगनाथ नाईकडे, हरिचंद्र वाघमोडे, एम. एन. मोहिते, सुनिता सिंग, एन. आर. प्रवीण, रेश्मा मोरे-व्होरकाटे यांच्यासह तब्बल २३ वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
वृक्षलागवडीच्या नावाने केवळ कागदोपत्री निधी उधळला गेला आहे. वडूज न्यायालयाच्या चौकशी आदेशाला वरिष्ठ न्यायालयाने स्थगिती दिली असली, तरी या अन्यायाविरोधात आम्ही मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात दाद मागणार आहोत. – दादासाहेब चव्हाण, तक्रारदार
वडूज प्रथमवर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांच्या चौकशी आदेशाला आम्ही अतिरिक्त जिल्हा न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायालयाने तक्रारीतील तथ्यांची दखल घेत चौकशी प्रक्रियेला स्थगिती दिली आहे. — रेश्मा सुधीर मोरे-व्होरकाटे, विभागीय अधिकारी, सामाजिक वनीकरण
