सातारा येथील गुरुकुल इंग्रजी माध्यमातील इयत्ता चौथीची विद्यार्थिनी कु.अनुष्का नामदेव तेलोरे हिने काढलेले चित्र नासाच्या पेलोडवर चितारले जाणार आहे. जागतिक पातळीवर तिला मिळालेला हा सन्मान आहे. नासाने घेतलेल्या चित्रकला स्पध्रेत हजारो चित्रे आली होती त्यातून तिला हा सन्मान मिळाला आहे.
अमेरिकेच्या नॅशनल स्पेस सोसायटीने विज्ञान दिनानिमित्त कविता, निबंध तसेच चित्रकला स्पध्रेचे आयोजन केले होते. भारतातील डॉ.कलाम इनिशिएटिव्ह सोसायटीच्या शाखेनेही या स्पर्धा घेतल्या होत्या. या स्पध्रेतील पारितोषिक विजेत्यांना विशेष सन्मान देण्यात येणार आहे. स्पध्रेत प्रथम विजेत्याचे चित्र, त्याच्या शाळेचे नाव सप्टेंबर २०१७ रोजी चंद्रावर पाठवण्यात येणाऱ्या पेलोडवर कोरण्यात येणार आहे. पेलोड म्हणजे सॅटेलाईट लाँच व्हेइकलचा (एसएलव्ही) समोरचा भाग. एसएलव्हीच्या या समोरच्या भागावर अनुष्काचे चित्र चितारले जाणार आहे. या चित्रात तिने भारत देश, तिरंगा तसेच परग्रहावरील सजीवाला पृथ्वीवर येण्यासाठी मार्ग दाखवला आहे. अवकाश यान तसेच काही बारकाव्यातून आपल्या देशाची, पृथ्वीची ओळख करून दिली आहे. या मोहिमेचे नेतृत्व भारत करतो आहे हे ही तिने दाखवले आहे. या बारकाव्यांनी तिच्या चित्राला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. तिला संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे यांनी प्रोत्साहन दिले तर चित्रकला शिक्षिका सुप्रिया कुष्टे, सोनाली काटकर तसेच मुख्याध्यापिका शीला वेल्हाळ, लीना जाधव, विश्वनाथ फरांदे यांनी मार्गदर्शन केले.
या तिच्या यशाबद्दल तिचा शाळेत गौरव करण्यात आला. तिचे वडील प्रा.डॉ.नामदेव तेलोरे यांनी या तिच्या यशाबद्दल बोलताना, अनुष्का रांगोळी सुंदर काढते, मात्र चित्रकलेच्या तिच्या आवडीची जाणीव आम्हाला झाली. तिने आमचे, शाळेचे आणि देशाचे नाव, कीर्ती उंचावली याबद्दल मला तिचा अभिमान वाटतो असे सांगून तिच्या या कलागुणाकडे आता आम्ही अधिक गांभीर्याने लक्ष देणार असल्याचे सांगितले.