सातारा : जिल्ह्यातील सर्वच १७ साखर कारखान्यांच्या यंदाच्या गळीत हंगामाची सांगता झाली. या कारखान्यांकडून एक कोटी आठ लाख ४९ हजार ९९१ टन उसाचे गाळप होऊन एक कोटी सात लाख ५७ हजार ३० क्विंटल साखरनिर्मिती झाली आहे. सरासरी ९.३१ टक्के उतारा मिळाला आहे. सहकारी कारखान्यांनी साखरनिर्मिती आणि उताऱ्यात, तर खासगी कारखान्यांनी गाळपात आघाडी ठेवली आहे.
जिल्ह्यातील नऊ सहकारी व आठ खासगी कारखान्यांनी ऊसगाळप केले आहे. जिल्ह्यात जरंडेश्वर कारखान्याने सर्वाधिक १९ लाख १५ हजार १६६ टन इतके गाळप केले असून, १६ लाख ३५ हजार १०० क्विंटल साखरनिर्मिती करून जिल्ह्यात आघाडी घेतली आहे.
देयकांना विलंब
ऊस हंगामाचे दर लवकर निश्चित झाल्यामुळे आंदोलने झाली नाहीत. शेतकऱ्यांचा ऊस तुटल्यावर १४ दिवसांत खात्यावर बिल जमा करण्याची कायदेशीर जबाबदारी कारखान्यांची असते. मात्र, हा नियम बहुतांश कारखान्यांनी पाळलेला दिसत नाही. अनेक कारखान्यांची बिले एक ते दीड महिना उशिरा दिल्याने शेतकऱ्यांना पीककर्ज व इतर कर्जाच्या व्याजाचा भुर्दंड सोसावा लागला आहे. हंगाम संपत आल्यावर अखेरची बिले येण्यासही उशीर होता. मार्च महिन्यात पीक कर्ज नवी-जुनी करावी लागत असल्याने पुढील आठ ते दहा दिवसांत सर्व बिले वेळेत जमा करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
‘खासगी’ची गाळपात आघाडी
अजिंक्यतारा कारखान्याची आघाडी असून, या कारखान्यास सरासरी १२.६६ टक्के उतारा मिळाला. या हंगामात सहकारी कारखान्याबरोबर खासगी कारखान्यांनी महत्त्वाची भूमिका बजावत मोठ्या प्रमाणात गाळप केले. या सात खासगी कारखान्यांनी ५९ लाख ९० हजार ९१३ टन उसाचे गाळप केले आहे. त्याद्वारे ५२ लाख ३२ हजार ६१५ क्विंटल साखरनिर्मिती केली आहे. मात्र, खासगी कारखान्यांच्या साखर उताऱ्यात घट झाली आहे. खासगी कारखान्यांचा सरासरी ८.७३ टक्के साखर उतारा मिळाला आहे.
याउलट सहकारी कारखान्यांची परिस्थिती आहे. सहकारी साखर कारखान्यांनी ४८ लाख ५९ हजार ७८ टन उसाचे गाळप करत ५५ लाख २४ हजार ४१५ क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे, तर सहकारी साखर कारखान्यांचा सरासरी ११.३७ टक्के साखर उतारा मिळाला आहे. साखर उतारा चांगला मिळत असल्याने सहकारी कारखान्यांनी कमी गाळप करत जास्त साखरनिर्मिती केली आहे.
चार महिने चालला हंगाम
जिल्ह्यातील सर्व कारखान्यांचा गाळप हंगाम नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीस सुरू झाला होता. दुष्काळी तालुक्यांसह सर्वत्र ऊस लागवड झाल्याने मोठ्या प्रमाणात ऊस गाळपास उपलब्ध झाला. मात्र, साखर कारखान्यांची वाढलेली संख्या आणि वाढलेली क्षमता यांचा परिणाम हंगामावर दिसून आला आहे. हा हंगाम अवघा चार महिने सुरू राहिला आहे. मात्र, चार महिने गाळप हंगाम चालला असला, तरी साखरनिर्मितीत कोटीची उड्डाणे घेतली आहेत
गळीत हंगाम दृष्टिक्षेपात
- अजिंक्यतारा कारखान्यांचा सर्वाधिक १२.६६ टक्के साखर उतारा
- सहकारी साखर कारखान्यांचा सरासरी ११.३७ टक्के साखर उतारा
- जरंडेश्वर कारखान्याला सर्वाधिक गाळप व साखरनिर्मिती
- खासगी कारखान्यांकडूनही मोठ्या प्रमाणात गाळप
- प्रतिटन ३३०० ते ३५०० रुपये दरम्यान दर
