सातारा : सातारा येथील अजिंक्यतारा किल्ल्याचे सुशोभीकरण व संवर्धनासह संगम माहुली येथे महाराणी ताराबाई समाधी परिसराचा विकास व सुशोभीकरण करण्यासाठी राज्य शासनाने मंजुरी दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प मांडताना सातारा जिल्ह्याच्या पर्यटनवाढीस चालना दिली आहे. काही महत्त्वपूर्ण विकास प्रकल्पांना निधीची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये महात्मा फुले यांच्या जयंतीला पुढील वर्षी २०० वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने समिती स्थापन करून कटगुण (ता. खटाव) या जन्मस्थळी स्मारक उभारणी, सावित्रीबाई फुले यांच्या नायगाव येथील स्मारकाच्या उभारणीस, महाबळेश्वर तालुक्यातील दरे तांब येथे निसर्गोपचार केंद्र व मुनावळे ते वासोटा किल्ला येथे १२ किलोमीटरचा रोपवे या महत्त्वपूर्ण बाबी पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्यात येणार आहेत. याकरिता आराखडा बनवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सातारा जिल्ह्यातील एमआयडीसी तेथील पायाभूत सुविधा आणि विस्तारीकरण सॉफ्ट स्किल सेंटर या दृष्टीने सुद्धा भरीव तरतूद करण्याची घोषणा फडणवीस यांनी करत सातारा जिल्ह्यातील उद्योग आणि पर्यटनाला चालना देण्याचा प्रयत्न केला आहे.
संगम माहुली येथे महाराणी ताराबाई समाधी परिसरासह अन्य स्मारकांचा विकास व सुशोभीकरणासाठी १३३ कोटी रुपये, तर अजिंक्यताऱ्यासह अन्य किल्ल्यांच्या सुशोभीकरण-संवर्धनासाठी १३५ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे साताऱ्याच्या सौंदर्यात आणि ऐतिहासिक वैभवात मोठी भर पडणार आहे. हा प्रकल्प मंजूर करून घेतल्याबद्दल जिल्हावासीयांमधून समाधान व्यक्त होत आहे.
दरम्यान, पर्यटनवाढीसाठी आणि पर्यटकांच्या वेळेची, पैशांची बचत आणि शारीरिक कष्ट टाळण्यासाठी किल्ले वासोटावर जाण्यासाठी मुनावळे ते किल्ले वासोटा या रोप वेला शिवेंद्रसिंहराजेंच्या मागणीवरून मंजुरी देण्यात आली आहे. कराड येथील विमानतळाचा विकास करणे व विमानतळावर नाइट लँडिंगलादेखील मंजुरी देण्यात आली आहे.
साताऱ्यासाठी घोषणा
- जावळीच्या दुर्गम जंगलातील वासोटा किल्ल्यावर पर्यटक आणि भाविकांसाठी ‘रोप-वे’,
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरे (तांब) या गावी निसर्गोपचार केंद्र
- सातारा ‘एमआयडीसी’मध्ये पायाभूत सुविधा
- साताऱ्यातील पर्यटनवाढीसाठी चालना, निधी
- अजिंक्यतारा किल्ला – विकास योजना
- जिल्ह्यातील किल्ल्यांचे सुशोभीकरण व संवर्धन
- संगम माहुली येथील महाराणी ताराराणी समाधीचे संवर्धन
