कराड : सातारा जिल्ह्याला ‘पर्यटन हब’ बनविण्यासाठी आणि त्यातून स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार मिळवून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. साताऱ्याला जागतिक ‘पर्यटन हब’ बनविण्यासाठी कोयना- दौलत डोंगरीसारखे महोत्सव काळाची गरज असल्याचे ते म्हणाले. पाटणमध्ये कोयना- दौलत डोंगरी महोत्सवाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.

पालकमंत्री शंभूराज देसाई, लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याचे अध्यक्ष यशराज देसाई, जिल्हाधिकारी संतोष पाटील, सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, प्रांताधिकारी सोपान टोम्पे, तहसीलदार अनंत गुरव आदींची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी विविध विकासकामांचे उद्घाटनही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते समारंभपूर्वक उद्घाटन करण्यात आले.

एकनाथ शिंदे म्हणाले, महानगरे व शहरांमध्ये मोठमोठे सांस्कृतिक महोत्सव सतत होतच असतात. पण डोंगरी, दुर्गम, दऱ्याखोऱ्यातील शेतकरी, कष्टकरी जनतेला कोयना दौलत डोंगरीसारख्या महोत्सवातून सांस्कृतिक मेजवानी दिली जात आहे. निसर्गरम्य, ऐतिहासिक सातारा जिल्ह्याला राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय नकाशावर मानाचे स्थान देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.

जिल्ह्याचा पर्यटन विकास होवून महाबळेश्वरवरील पर्यटकांचा ताण कमी करणे, स्थानिकांना रोजगाराच्या संधी मिळवून देण्यासाठी ‘नवीन महाबळेश्वर’ विकसित होतंय. यामुळे स्थानिकांच्या जमिनींना चांगला भाव, पर्यटनाला मोठी चालना मिळेल. डिसेंबर-जानेवारीमध्ये ‘कोयना बॅकवॉटर फेस्टिवल’चेही आयोजन असून, हा महोत्सव जागतिक दर्जाचा करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

आपली बांधिलकी सर्वसामान्यांशी असल्यानेच ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ जन्माला आली. आणि ही योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नसल्याची ठाम ग्वाही एकनाथ शिंदे यांनी दिली.शंभूराज देसाई म्हणाले की, डोंगरी महोत्सवाला मोठा प्रतिसाद मिळाला. आता महोत्सवाचा कालावधी वाढवण्याची लोकांची मागणी आहे. डोंगरी महोत्सवात कृषी प्रदर्शन, बचत गटांचा मेळावा, पोवाडे, भजन, बँड आदी कार्यक्रमांच्या आयोजनासह दररोज संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. त्यात स्थानिक कलाकारांनाही संधी दिल्याचे शंभूराजेंनी सांगितले.

पाटण तालुक्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मिळालेल्या भरीव निधीतील विकासकामांचे उद्घाटन आज झाले. एकनाथ शिंदे यांच्यामुळेच तारळी धरणातील ‘शंभर हेड’वरून शेतकऱ्यांना पाणी देणे शक्य झाले. तसेच मोरणा- गुरेघर धरणातील पाणीही नदीपात्रात सोडण्यात आले असून, त्याचा फायदा दोन्ही तीरांवरील शेतकऱ्यांना झाल्याचे शंभूराज देसाई यांनी सांगितले.