सातारा : यूपीआय व्यवहारांवर १५ ऑक्टोबरपासून व्यापारी सवलत शुल्क (एमडीआर) लागू करण्याच्या प्रस्तावित निर्णयाविरोधात सातारा जिल्ह्यातील व्यापारी आक्रमक झाले आहेत. या निर्णयाच्या निषेधार्थ २ ऑक्टोबर रोजी राज्यव्यापी ‘क्यूआर कोड बंद’ आंदोलनाला साताऱ्यातून तीव्र पाठिंबा दर्शवण्यात आला आहे.

देशात नोटाबंदीनंतर डिजिटल व्यवहारांना चालना मिळाली असून, यूपीआय दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. मात्र, यूपीआय व्यवहारांवर ०.०४ टक्के शुल्क आकारण्याच्या प्रस्तावामुळे व्यापारी वर्गात प्रचंड नाराजी पसरली आहे. या शुल्काचा थेट आर्थिक भार व्यापाऱ्यांवर पडणार असल्याने चेंबर ऑफ कॉमर्सने याविरोधात आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.
२ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील सर्व व्यापाऱ्यांनी दिवसभर क्यूआर कोड बंद ठेवून केवळ रोखीने व्यवहार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या आंदोलनात साताऱ्यातील पेट्रोल पंपचालक, छोटे-मोठे विक्रेते आणि व्यापारी संघटनेशी जोडलेले व्यावसायिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

व्यापाऱ्यांना दुकानांमध्ये लावता यावेत यासाठी ‘ ‘क्यूआर नको, रोख द्या’ अशा संदेशांचे फलक उपलब्ध करून देण्यात येत आहेत. तसेच समाजमाध्यमांवरूनही जनजागृती सुरू आहे. नव्या नियमांबाबत स्पष्टता नसल्याने नागरिक व व्यापाऱ्यांमध्ये व वापरकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण असून, प्रशासनाकडूनही योग्य माहिती दिली जात नसल्याची भावना व्यक्त होत आहे.

यूपीआय व्यवहारांवर अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि रोखीने व्यवहार करता यावेत यासाठी सातारा फलटण कराड वाई महाबळेश्वर पाचगणी कोरेगाव लोणंद म्हसवड शिरवळ आदी ठिकाणी व्यापारी आणि ग्राहक या स्तरावर जनजागृती करण्यात येत आहे. यापुढे यूपीआय व्यवहारांवर हळूहळू मोठे शुल्क आकारले जाईल. दिवसेंदिवस व्यापारी नफा कमी होत आहे. वेगवेगळ्या करांमुळे (टॅक्स) आणि बाजारातील स्पर्धेमुळे किरकोळ व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडलेले आहे. अशावेळी नको ते कर डोक्यावर लादून घेण्यापेक्षा आत्तापासून जनजागृती करा. यूपीआयच्या आहारी जाऊ नका. जास्तीत जास्त व्यापाऱ्यांनी आणि ग्राहकांनी व वापरकर्त्यांनी यूपीआय वापराच्या दुष्परिणाम ची जाणीव करून घ्यावी अशी मागणी ही व्यापारी स्तरावरून आणि ग्राहक स्तरावरून वेगवेगळ्या क्लूप्त्यांद्वारे जागृती करण्यात येत आहे. किरकोळ व्यापारी असोसिएशनने, भाजीपाला व्यवसायिकांनी याबाबत तीव्र भूमिका घेतली आहे.