सातारा : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या ‘विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमे’मुळे सातारा जिल्ह्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. मतदारयादीच्या डिजिटायझेशन आणि पडताळणीनंतर जिल्ह्यातील तब्बल ३ लाख ४३ हजार (१२.९५ टक्के) दुबार, मयत आणि स्थलांतरित मतदारांची नावे वगळली जाणार आहेत. जिल्ह्यात आधी नोंदणीकृत २६ लाख ५१ हजार ३४७ मतदार होते. मात्र, २३ लाख ७ हजार ४८८ मतदारांचे यशस्वी डिजिटायझेशन झाले. त्यामुळे जिल्ह्यातील आठही विधानसभानिहाय मतदारयादी पारदर्शक होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

शहरीकरण आणि वाढत्या स्थलांतरामुळे सातारा मतदारसंघात सर्वाधिक ६२ हजार १४२ (१८.०५ टक्के) दुबार नावे आढळली. ती वगळण्यात आली आहेत. त्या पाठोपाठ वाई (४६,३४७) आणि माण (४५,६६०) मतदारसंघात मोठी घट झाली आहे. या सखोल पुनरीक्षण मोहिमेची प्रारूप मतदारयादी २४ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. यानंतर नागरिकांना दावे आणि हरकती नोंदवण्यासाठी एक महिन्याची मुदत दिली जाईल. नाव नोंदवणे किंवा दुरुस्तीसाठी नागरिकांना आपल्या परिसरातील ‘बीएलओ’कडे अर्ज करता येईल.

सातारा जिल्ह्यात मतदारयादी सखोल पुनरीक्षण मोहिमेचे काम अंतिम टप्प्यात आहे. २४ ऑगस्टला जाहीर होणारी प्रारूप यादी गावागावांतील मतदान केंद्रांवर उपलब्ध असेल. या मोहिमेमुळे जिल्ह्याची मतदारयादी बिनचूक आणि पारदर्शक होणार आहे. -भगवान कांबळे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक)

नावे वगळण्याची कारणे

मृत मतदार, कायमस्वरूपी स्थलांतरित, दुबार किंवा पुनरावृत्ती झालेली नावे, अपात्र मतदार यांची नावे कमी झाली आहेत. मतदारयादीतील आपल्या नावाबाबत खात्री करण्यासाठी voters.eci.gov.in या ‘पोर्टल’वर जाऊन शोध घेऊ शकता. चुकीच्या माहितीमुळे नाव कमी झाले असेल, तर सहा क्रमांकाचा अर्ज भरून नव्याने नोंदणीसाठी अर्ज करू शकता.

वगळलेली मतदारसंख्या
विधानसभा मतदारसंघ – एकूण मतदार – घट झालेली टक्केवारी

सातारा ३,४४,२८० ६२,१४२ १८.०५
फलटण ३,४७,६६१ ४४,४९१ १२.८०

माण ३,६८,९३६ ४५,६६० १२.३८
वाई ३,५३,९८७ ४६,३४७ १३.०९

कोरेगाव ३,२८,०५४ ४४,३६० १३.५२
कराड उत्तर ३,०२,९४७ ३०,०१६ ९.९१

कराड दक्षिण ३,०३,२०२ ३६,१४३ ११.९२
पाटण ३,०२,२८० ३४,११९ ११.२९