सातारा : विधान परिषदेच्या पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू असतानाच प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सातारा जिल्ह्यातील वाई येथील प्रारूप मतदार यादीत एका शिक्षकाच्या नावाऐवजी चक्क ‘बॉम्बस्फोट’ आणि वडिलांच्या नावात ‘बॉम्ब’ अशी नोंद झाल्याचे उघडकीस आले आहे. या अजब प्रकाराची सर्वत्र चर्चा सुरू आहे. ही चूक संगणक प्रणालीद्वारे इंग्रजी मजकुराचे मराठी भाषांतर होताना घडल्याचे स्पष्ट झाले आहे.
वाई येथील भाग क्रमांक २१८ च्या प्रारूप मतदार यादीत ३० व्या क्रमांकावर असलेले प्रशांत दादासाहेब बोंबले-पाटील (रा. सोनगिरवाडी, वाई) यांच्या नावाबाबत हा प्रकार घडला आहे. संबंधित मतदार हे पाचगणी येथील ‘आयटीआय’मध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. यादीत त्यांच्या नावाची नोंद ‘प्रशांत दादासाहेबांचे बॉम्बस्फोट’ आणि वडिलांचे नाव ‘दादासाहेबांचा बॉम्ब’ अशी करण्यात आली. विशेष म्हणजे, या नोंदीसोबत संबंधित मतदाराचा फोटो आणि ओळखपत्र क्रमांकही गहाळ आहे. याच यादीतील ३५ व्या क्रमांकावर असलेल्या समीर सुधाकर चौधरी या पुरुष मतदाराच्या लिंगाच्या रकान्यात ‘स्त्री’ असा चुकीचा उल्लेख करण्यात आला आहे.
या चुकांची छायाचित्र समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर याची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. या मतदारसंघात आगामी २३ ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून, अंतिम यादी ४ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे. मात्र, प्रारूप यादीतील या निष्काळजीपणामुळे दोषींवर कारवाईची मागणी होत आहे.
माझ्या आडनावाची नोंद अनवधानाने बदलली होती. याबाबत मला कल्पना नव्हती, मात्र चर्चा सुरू झाल्यानंतर वाई निवडणूक प्रशासनाने ही चूक तत्काळ दुरुस्त केली आहे. याबाबत त्यांनी मला कळविले आहे. माझी कोणतीही तक्रार नाही. – प्रशांत दादासाहेब बोंबले-पाटील (शिक्षक मतदार)
मतदार यादी तयार करताना सर्व तपशील ‘युनिकोड’ प्रणालीत समाविष्ट केला जातो. प्रणालीमध्ये संबंधित मतदाराचे नाव इंग्रजीत योग्य आहे. परंतु, मराठी भाषांतर होताना तांत्रिक चूक होऊन हा बदल घडलेला आहे. ही चूक निदर्शनास येताच ती दुरुस्त करण्यात आली आहे. – सोनाली मेटकरी-शिंदे (तहसीलदार, वाई)
