सातारा: जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेचा आणि अध्यक्षपदाचा संघर्ष अगदी टोकाला पोहोचला आहे. राष्ट्रवादी अजित पवार पक्ष आणि शिवसेना शिंदे पक्षाच्या सदस्यांची फोडाफोडी व घोडेबाजार टाळण्यासाठी दोन्ही पक्षांचे आणि अपक्ष सदस्य अज्ञातस्थळी सहलीवर गेले आहेत.
काहीही झाले तरी जिल्हा परिषद अध्यक्ष हा भाजपचाच होणार असल्याचे वक्तव्य भाजपचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केले होते. तर ‘देवेंद्र है तो सब मुमकिन है’ असे शिवेंद्रसिंहराजे म्हणाले होते. त्यामुळे सावध झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांनी आपापल्या सदस्यांना आज सहलीवर पाठवले आहे. दोन्ही पक्षांचे सदस्य अज्ञातस्थळी रवाना झाल्याने अध्यक्षपदासाठी भाजपकडून होणारा घोडेबाजार टाळण्यासाठी राष्ट्रवादी शिवसेनेने हा निर्णय घेतला आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालात कोणालाच स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. महायुती अंतर्गत घटक पक्षात झालेल्या या निवडणुकीत शिवसेना राष्ट्रवादीने जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकित महायुतीतील अंतर्गत संघर्ष टाळण्यासाठी महायुती एकत्र म्हणून लढवाव्यात असे सुरुवातीलाच सुचविले होते. त्याप्रमाणे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी बैठकही बोलाविली होती. मात्र या बैठकीकडे भाजपा च्या प्रमुख नेत्यांनी पाठ फिरवली होती. त्यानंतर ही निवडणूक निवडणूक भाजपने स्वबळावर लढविणार असल्याचे सांगून त्याप्रमाणे व्यूहरचना केली होती. यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीची चर्चा झाली.
त्यावेळी सर्व पक्ष स्वतंत्र लढले. त्यामुळे निवडणुकीत भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांमध्ये निवडणुकीत मोठा संघर्ष झाला. शंभूराज देसाई यांच्या पाटण आणि मकरंद पाटील यांच्या वाई मतदार संघात फोडाफोडी करून त्यांच्यावर जोरदार टीका परत मतदार संघातील वातावरण विस्कळीत केले होते. निवडणुकीनंतर कोणालाही बहुमत मिळाले नाही. भाजपाने ६१ जागा लढवून २७ जागा मिळाल्या. तर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला ३६ जागा लढवून २१ व शिवसेना शिंदे पक्षाने १५ जागा मिळवल्या. त्यामुळे बहुमत यांचे झाले. अपक्ष आणि काँग्रेसच्या एक सदस्य पाटील आणि देसाईं बरोबर आहेत.
बहुमत न मिळाल्याने राज्यात महायुती असताना येथे त्रिशंकू सारखी परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी भाजप विरुद्ध राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष टोकाला गेला आहे. बहुमत नसले तरी जिल्हा परिषद अध्यक्ष भाजपचाच होईल असे गोरे यांनी सांगताच, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येऊन सत्ता स्थापन करणार असल्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी सांगितले. काही झाले तरी आम्ही दोघे एकत्रच आहोत असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे भाजप नेत्यांना महायुती आठवण झाली. मात्र, प्रचारात भाजप नेत्यांनी आक्रमक टीका केल्याची व मतदारसंघात फोडाफोडीच्या राजकारणाची उदाहरणे देत त्यांना सत्तेपासून दूर ठेवण्याचा पवित्रा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने घेतला.
काही झाले तरी अध्यक्ष भाजपचा करायचा आहे. त्यासाठी जयकुमार गोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीची वेळ मागितली होती. मात्र, त्यांनी वेळ दिली नाही. म्हणून मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना मध्यस्थी करण्यासाठी पुढे करण्यात आले. त्यानंतर ही तोडगा निघाला नाही. तोडगा निघत नसल्याने जिल्हा परिषद सदस्यांचा घोडेबाजार(ऑपरेशन लोटस) करायला सुरुवात झाली. राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या काही सदस्यांची संपर्कही साधला गेला.
भाजपाच्या या पवित्र्याने सावध झालेल्या मकरंद पाटील आणि शंभूराज देसाई यांनी घोडेबाजार टाळण्यासाठी आपापल्या सदस्यांना आज साताऱ्यात बोलावून घेतले. जिल्हा परिषद देसाईंच्या गटाची नोंदणी अगोदरच झाली होती. सोमवारी सायंकाळी मकरंद पाटील यांच्या गटाची नोंदणी होताच सर्व सदस्यांना रात्री अज्ञातस्थळी सहलीवर पाठवले आहे. या सर्व प्रकारा पाठीमागे जिल्ह्यातील भाजप अंतर्गत नेत्यांचा संघर्ष ही कारणीभूत असल्याचे सांगितले जाते.

