सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या ६५ गट आणि ११ पंचायत समितीच्या १३० गणासाठी शनिवारी दिनांक ७ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या कालावधीमध्ये मतदान होत आहे. या मतदानासाठी जिल्ह्यात ११ हजार ८२२ मतदान यंत्र तैनात करण्यात आले आहेत. सातारचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील २१ लाख९४ हजार ११० मतदार मतदान करणार आहेत. यासाठी वीस हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सातारा जिल्ह्यातील जावळी, पाटण, महाबळेश्वर, वाई, कराड येथील काही अति दुर्गम व मागास भागातही मतदान यंत्रणा पोहोचवण्यासाठी हालचाली सुरू आहेत.

सातारा जिल्ह्यामध्ये आठ वर्षांनंतर होणाऱ्या सातारा जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात सत्ताधाऱ्यांतर्गतच तसेच विरोधी पक्षातील उमेदवारांची कसोटी लागणार आहे. बऱ्याच अपेक्षांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. स्थानिक जिरवा जिरवीच्या राजकारणामुळे काही अपक्षांनी आपले उमेदवारी अर्ज ठेवून या निवडणुकीत आपलं अस्तित्व दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे.

सातारा जिल्ह्यात अकरा लाख ८ हजार २०३ पुरुष व दहा लाख ८५ हजार ८४७ महिला आणि इतर ६० मतदार नोंदणी झालेली आहे. जिल्ह्यातील २,८७७ मतदान केंद्रावर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस व खासगी वाहनाने मतदान यंत्रणा व कर्मचाऱ्यांना जाण्या येण्यासाठी सोय केली आहे. तर दुसऱ्या बाजूला परगावातील मतदारांसाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम उमेदवारांनी वाहनांचे नियोजन केले आहे.

तालुकानिहाय कर्मचारी पुढीलप्रमाणे आहे. सातारा – ३७१, कराड – ४८६, पाटण- ४०१, कोरेगाव २५३, वाई – १८१, खंडाळा – ११४, महाबळेश्वर- १०९, जावळी- १५४, फलटण- २८२, माण – २१७, खटाव– ३०९.

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना या यंत्रणेची तपासणी करूनच मतदानाला सुरुवात करावी लागणार आहे. तसेच काही ठिकाणी तक्रार असेल तर त्या तक्रारीचे तातडीने जागेवरच निरसन करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. भरारी पथकही सोबत असले तरी त्यांना सुद्धा मर्यादा येत आहेत. या निवडणुकीमध्ये अटीतटीची लढत असल्यामुळे ग्रामीण भागात आतापासूनच मतदान पत्रिका व त्यावरील राजकीय पक्षाचे चिन्ह खुलेआम छपाई करून आणलेले आहेत. या चिन्हाबाबत आता नियमावली करणे गरजेचे बनले आहे, असे नागरिकांनी सांगितले.