सातारा : सातारा जिल्हा परिषदेसाठी महायुतीअंतर्गत पक्षांमध्ये सुरू झालेली स्पर्धा आता मुंबईत तीनही पक्षांच्या वरिष्ठांकडे येऊन पोहोचली आहे. या जिल्हा परिषदेतील सत्तास्थापनेसाठी आता भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडून तोडगा काढला जाण्याची शक्यता आहे. या अंतर्गत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यात आज महत्त्वाची बैठक पार पडली. याशिवाय मकरंद पाटील आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांनीही त्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.

सातारा जिल्हा परिषदेत त्रिशंकू स्थिती निर्माण झाल्यामुळे सत्ता मिळवण्यासाठी राजकीय गणित जुळविण्याचे काम सुरू आहे. जिल्हा परिषद सत्तास्थापनेसाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यात आज बैठक होत चर्चा झाली. तत्पूर्वी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी उपमुख्यमंत्री सुमित्रा पवार यांची भेट घेतली.

त्यानंतर सुनील तटकरे यांच्याशी चर्चा करून येथील परिस्थिती, प्रमुख कार्यकर्ते आणि जिल्हा परिषदेच्या सदस्यांचे मत त्यांना सांगितले. त्यानंतर मकरंद पाटील आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी त्या अनुषंगाने दुपारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेतली. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. सातारा जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेच्या अनुषंगाने चर्चा केली. या तीनही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या चर्चेनंतर महायुतीतील हे तीनही पक्ष एकत्रित सत्तेवर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सातारा जिल्हा परिषदेचा निवडणूक निकाल ९ फेब्रुवारी रोजी लागला. ६५ जागांपैकी महायुतीला तब्बल ६३ जागा मिळाल्या आहेत. यामध्ये भाजपला सर्वाधिक २७, राष्ट्रवादी काँग्रेसला २०, शिवसेना १५, काँग्रेस १, स्वाभिमानी शेतकरी संघटना १, अपक्ष १ अशा जागा मिळाल्या आहेत.

बहुमतासाठी आवश्यक ३३ जागा या कोणत्याच पक्षाला न मिळाल्याने गेले काही दिवस महायुतीअंतर्गतच पक्षांमध्ये राजकीय स्पर्धा लागली आहे. सुरुवातीला राष्ट्रवादी आणि शिवसेनेने एकत्र येत सत्तास्थापनेसाठी हालचाली केल्या. यासाठी काही बैठकाही पार पडल्या. आता पुढे भाजपही यात सक्रिय झाल्याने चुरस वाढली आहे. सावधगिरी म्हणून सर्वच पक्षांनी आपले सदस्य सहलीला पाठवत ताब्यात ठेवले आहेत.

निवडणूक निकालाच्या दहा दिवसांनंतर अजूनही सत्तेचा घोळ कायमच दिसत आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार अंतिम निर्णय घेणार आहेत.