Satara ZP Result 2026 Big Fight: माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांना जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. नरेंद्र पाटील यांच्या पत्नी प्राची पाटील यांचा मंद्रुळ कोळे गटातून पराभव झाला आहे. शिंदेगटाच्या मृणाल पाटील या २२ वर्षीय तरुणीने पाटील यांचा पराभव केला आहे. सर्वात तरुण उमेदवार म्हणून चर्चेत आलेल्या या लढतीकडे जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते.

नरेंद्र पाटील यांची ताकद लागली होती पणाला

माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे नेते मानले जातात. पाटील यांचे फडणवीसांवरील प्रेमही सर्वज्ञात आहे. हातावर फडणवीसांचे नाव कोरल्यानंतर त्यांची राज्यभर चर्चा झाली होती. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत त्यांच्या पत्नी प्राची पाटील मैदानात होत्या. त्याच्याविरोधात शिंदेसेनेकडून अवघ्या २२ वर्षांच्या मृणाल पाटीलला उमेदवारी देण्यात आली होती. नरेंद्र यांनी पत्नीच्या विजयासाठी सर्व ताकद पणाला लावली होती.

तरुण उमेदवार ठरली जायंट किलर

मंद्रुळ कोळे मतदारसंघातील मृणाल पाटील या तरुण उमेदवाराच्या प्रचारासाठी मंत्री शंभूराज देसाई यांनी मोठे प्रयत्न केले होते. शिंदेसेनेकडून तरुण मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात त्यांना यश मिळाले. २२ वर्षीय मृणाल यांचा विजय झाल्याने नरेंद्र पाटील यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

भाजपाच्या बड्या नेत्यांकडून प्रचार

पाटण तालुक्यात भाजपाच्या बड्या नेत्यांनी प्रचारासाठी हजेरी लावली होती. जिल्ह्यातून मंत्री जयकुमार गोरे, शिवेंद्रसिंह भोसले यांनी आक्रमक प्रचार केला होता. याशिवाय राज्यातून मंत्री गणेश नाईक, भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी प्रचारसभा घेतल्या होत्या. शंभूराज देसाई यांच्याकडून देखील तालुक्यात जोरदार प्रचार करण्यात आला होता. चित्रा वाघ यांनी प्राची पाटील यांच्यासाठी प्रचारसभा घेतली होती.

मृणाल पाटील यांची प्रतिक्रिया

शंभूराज देसाई यांनी केलेल्या विकासाच्या जिवावर निवडून आल्याची प्रतिक्रिया मृणाल पाटील यांनी विजयानंतर दिली आहे. “ग्रामस्थांनी दाखवलेल्या विश्वासामुळे हा विजय शक्य झाला. बणपुरीला पहिल्यांदाच उमेदवारी मिळाली आणि त्यात यश मिळालं ही खूप मोठी गोष्ट आहे”, अशा भावना मृणाल पाटील यांनी व्यक्त केली.