कोल्हापूर : एकमेकावर तोफा डागणारे आजी-माजी पालकमंत्री बुधवारी एकमेकांसमोर आल्यावर त्यांच्यात हास्याचे कारंजे फुलले. संघर्ष विसरू अल्पकाळात का असेना त्यांच्या सुसंवाद रंगल्याचे पाहून कार्यकर्तेही स्मितीत झाले.

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने पालकमंत्री सतेज पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

आजी-माजी पालकमंत्र्यांनी परस्परांना टीकेचे लक्ष्य केले आहे. यामुळे चुरशीच्या निवडणुकीत तणावाचे प्रसंगही घडताना दिसत आहेत. अशा स्थितीत आजच आहे एका प्रसंगाने राजकारणाच्या पलीकडे असणाऱ्या माणुसकीच्या संबंधाचे दर्शन घडले.

त्याचे असे झाले. येथील भेंडे गल्लीतील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांच्या दर्शनासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील आले होते. तेथून माजी पालकमंत्री तेथून बाहेर पडत असताना समोर विद्यमान पालकमंत्री आले.

सतेज पाटील यांच्या समवेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष राजू लाटकर यांनी दादांना नमस्कार केला. लाटकर यांच्या मागे असलेल्या पालकमंत्री पाटील यांनी दादांचे लक्ष वेधत नमस्कार करीत ‘ आम्ही इकडे आहोत’ असे सांगितले. त्यावर आमदार पाटील यांनीही त्यांना नमस्कार करीत ‘आम्ही इकडे आहोत’ अशी मिश्किल टिपणी केली. यामुळे दोघांसह कार्यकर्त्यांतही हास्याचे कारंजे काही काळ का असेना पण फुलले.

संघर्ष विसरून दोघे हास्यविनोद रमल्याने उपस्थितांनी हायसे वाटले. अल्पकाळात नंतर दोघेही तेथून निघून गेल्यानंतर कार्यकर्ते मात्र आपण विनाकारण आपण एकमेकांवर उखडत असतो, असे म्हणत चर्चा करीत राहिले.