कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी सतेज पाटील यांनी महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवण्याची घोषणा केली असली तरी त्यांना उमेदवार मिळत नाहीत. त्यासाठी जिल्हाभर फिरण्याची वेळ आली आहे. या निवडणुकीत मतदार महायुतीच्याच पाठीशी राहतील, असे मत खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केले. गोकुळ दूध संघाची निवडणूक यंदा अत्यंत चुरशीची होणार असून, या निवडणुकीत गोकुळची दहीहंडी महायुतीच फोडणार असा विश्वास भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला आहे.
कोल्हापुरातील सहकार क्षेत्रातील सर्वात मोठ्या गोकुळ दूध संघाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीने एकत्रित निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत बोलताना धनंजय महाडिक म्हणाले, मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतः लक्ष घालून महायुतीच्या सर्व नेत्यांना एकत्र येण्याच्या सूचना दिल्या आहेत. स्थानिक मतभेद बाजूला ठेवून आम्ही सर्व एकदिलाने ही निवडणूक लढवणार आहोत.
सतेज पाटील यांच्यावर टीका करताना महाडिक म्हणाले, गेल्या वेळी सत्तेसाठी त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीची मदत घेत पक्षीय राजकारण गोकुळमध्ये आणले. मागील गोकुळ निवडणुकीच्या वेळी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना सत्तेतील सर्व नेत्यांना सोबत घेऊन निवडणूक लढविण्यात आली होती. आता समविचारी आघाडीची गरज का भासत आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
यापूर्वी ३० वर्षे महादेवराव महाडिक आणि काँग्रेसचे पी. एन. पाटील यांनी एकत्र येऊन पक्षविरहित कारभार केला होता. आता पुन्हा एकदा महायुतीचा अध्यक्ष गोकुळवर बसणार हे निश्चित आहे. महायुतीतील घटक पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढवतील आणि गोकुळमध्ये महायुतीला २५, तर महाविकास आघाडीला एकही जागा मिळणार नाही.
गोकुळची निवडणूक महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच होईल. महायुतीतील सर्व घटक पक्ष एकदिलाने निवडणूक लढतील. जिल्ह्यातील संस्थाचालक आणि ठरावधारकांचा मिळणारा प्रतिसाद पाहता महायुतीच्या बाजूने वातावरण असल्याचा दावा त्यांनी केला.
गोकुळची निवडणूक बिनविरोध झाली तर चांगलेच आहे; मात्र त्यासाठी महायुतीकडून कोणाला प्रस्ताव देण्याची आवश्यकता नाही, असे महाडिक यांनी म्हटले आहे. महायुतीतील घटक पक्षांची संख्या आणि पाठिंबा मोठा असल्याने निवडणूक झाली तरी महायुती सक्षमपणे सामोरे जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
