कोल्हापूर : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचे महापौर पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले झाले आहे. मात्र मुंबईच्या महापौर पदाचा निर्णय दिल्लीतचं होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना किती दबावाखाली आहे हे दोन-तीन दिवसांत झालेल्या घटनांवरून येते. शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर अजून शिल्लक आहे का? हे दोन दिवसात कळेलच, टोला काँग्रेसचे विधानपरिषद गटनेते आमदार सतेज पाटील यांनी लगावला. मुंबईत आरक्षण सोडत झाल्यानंतर आमदार पाटील कोल्हापुरात माध्यमांशी बोलत होते. कोल्हापूर महापालिकेचं महापौरपद शिवसेनेला मिळणार नाही, मिळालं तर त्यांचं अभिनंदन करायला हवं असा, असा चिमटा ही त्यांनी काढला.

निवडणुकीनंतर महापौर पदाचा आरक्षण असा प्रकार पहिल्यांदाच घडत आहे. नियम आणि कायदे सरकार म्हणल तसे सुरू आहेत. आज झालेला महापौर पदाचे आरक्षण मागील आरक्षण पाहून झालं आहे का याची खात्री केली पाहिजे. जिल्हा परिषदांचा आरक्षणाबाबतच्या वेळी हा विचार झाला नव्हता. कोल्हापूर महापालिकेत शिवसेनेला महापौर पद मिळणार नाही. मिळालं तर त्यांचं अभिनंदन करायला हवं. महायुती मधील घटक पक्ष अनेक ठिकाणी निवडणूकपूर्व आणि निवडणूकीनंतर आघाडी करून एकत्र आले आहेत. त्यामुळे महापौर निवडीत काही गडबड होईल असं वाटत नाही.

कोल्हापूर आणि इचलकरंजी दोन्ही ठिकाणी ओबीसी आरक्षण पडलं आहे, आता कोल्हापूरकरांना उत्सुकता आहे की या दोन्ही ठिकाणी मूळ भाजपचा महापौर होणार की नव्याने भाजप मध्ये आलेला महापौर होणार, २० वर्ष आमच्या विरोधात लढलेल्या कार्यकर्त्याला पद मिळणार की नवख्याला हे आम्हालाही आता बघायचे आहे, असा मिश्किल टोला आमदार सतेज पाटील यांनी लगावला.

तर काँग्रेस म्हणून महापौर पदाची निवडणूक लढवायची का याचा निर्णय आम्ही निवडीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर बैठक घेऊन करणार असल्याचही आमदार पाटील यावेळी म्हणाले. कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे काँग्रेसचे ३५ उमेदवार विजयी झाले आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री सध्या दावोस दौऱ्यावर आहेत, याच दरम्यान मुंबईत राज्यातील २९ महानगरपालिकांच्या महापौर पदाचा आरक्षण निघाला आहे. कोल्हापूरच्या महापौर पदाचा निर्णय देखील मुख्यमंत्री घेणार असतील तर इथले नेते सक्षम नाहीत हेच यावरून स्पष्ट होतं असल्याचेही काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी स्पष्ट केलं.