कोल्हापूर : राज्य शासन गोकुळ दूध संघामध्ये शासकीय सदस्य नेमणार, त्यांना मताचा अधिकार देणार या केवळ चर्चा आहेत. केवळ गोकुळसाठी शासन अशी कृती करेल असे वाटत नाही. मात्र, त्यांनी असे काही केलेच तर आम्ही न्यायालयात जाऊ, अशी भूमिका काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते सतेज पाटील यांनी रविवारी माध्यमांशी बोलताना मांडली.

आमदार पाटील म्हणाले, गोकुळ मध्ये शासकीय सदस्य नेमून त्यांना मताचा अधिकार देणार असतील तर मग जिल्हा परिषद, महापालिका, पंचायत समिती येथेही तज्ज्ञ सदस्य आहेत, त्यांनाही मताचा अधिकार देणार का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

गोकुळच्या साडेपाच लाख शेतकऱ्यांनी समविचारी आघाडीला बहुमत दिले आहे. तांत्रिक मुद्द्यावरुन गोकुळची नवनिर्वाचित सदस्यांची पहिली बैठक पुढे गेली आहे. उच्च न्यायालयाने पंधरा दिवसांत अध्यक्ष निवड होणे गरजेचे असल्याचे मत नोंदवले आहे.

सोमवार निर्णायक

सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे. त्यामुळे उद्या तरी निर्णय होईल अशी अपेक्षा असल्याचे आमदार पाटील म्हणाले. आता सध्या हे प्रकरण न्यायालयात गेले आहे. ठरावधारकांनी आम्हाला बहुमत दिले आहे. त्यामुळे तांत्रिक मुद्दा न करता अध्यक्ष निवड व्हावी, अशी अपेक्षा आमदार पाटील यांनी व्यक्त केली.

आम्हीच पाच वर्षे

आम्हाला मिळालेले बहुमत सत्ताधारी मान्य करायला तयार नाहीत. उलट, त्यांनी कौल मान्य करून पुढील पा च वर्षानंतर होणाऱ्या निवडणुकीच्या तयारीला लागावे. आमचे बहुमत पाच वर्षे असेच राहील, असा विश्वासही आमदार पाटील यांनी व्यक्त केला.

मंडलिकांची ‘ दांडी ‘ यात्रा

महायुतीच्या प्रमुख नेत्यांसह गोकुळमधील संचालकांची बैठक झाली. या बैठकीला शिंदे सेनेचे माजी खासदार संजय मंडलिक यांचे सुपुत्र, संचालक वीरेंद्र मंडलिक अनुपस्थित असल्याची चर्चा सुरू झाल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्काना उधाण आले. सोशल मीडियावरही ‘वीरेंद्र मंडलिक यांची बैठकीला दांडी” अशा आशयाचे संदेश व्हायरल झाले. दरम्यान, या चर्चेवर स्वतः वीरेंद्र मंडलिक यांनी स्पष्टीकरण दिले आहे. एका नातेवाईकाच्या कार्यक्रमानिमित्त आपण बेळगाव येथे असल्याने बैठकीला उपस्थित राहू शकलो नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.