कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी दररोज वेगवेगळ्या घडामोडी घडत असताना गुरुवारी काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील आणि भाजप समर्थक आमदार शिवाजी पाटील यांच्या मध्ये बंद दरवाजा आड गुफ्तगू झाले. गोकुळची निवडणूक महायुतीच्या झेंड्याखाली लढवण्याची तयारी सुरू असताना विरोध पक्षातील नेते एका खोलीत बसून खलबते करीत असल्याने त्यावरून चर्चा रंगली आहे.

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी सतेज पाटील यांनी जिल्ह्याचा दौरा सुरू केला आहे. आज त्यांनी चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजी पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. आगामी गोकुळ दूध संघ आणि कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील आगामी घडामोडींच्या दृष्टीने या भेटीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे यावेळी काँग्रेसचे स्थानिक नेते आणि प्रमुख पदाधिकारी प्रथमच आमदार शिवाजी पाटील यांच्या निवासस्थानी उपस्थित राहिले.

यावेळी सतेज पाटील – शिवाजी पाटील यांच्यात बंद खोलीत सुमारे अर्धा तास चर्चा झाली. या चर्चेत नेमक्या कोणत्या विषयांवर विचारविनिमय झाला, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी आगामी गोकुळ आणि जिल्हा बँकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेली ही भेट निश्चितच महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

सहकार क्षेत्रातील आगामी निवडणुकांपूर्वी झालेल्या या भेटीमुळे जिल्ह्याच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली असून, आगामी काळातील राजकीय समीकरणांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्याच्या परिस्थितीत सुनावणी आणि हरकतींच्या नावाने त्रास दिला जात असून, गावातील दूध संस्था बदनाम का केल्या जात आहेत, असा सवाल काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील यांनी उपस्थित केला.

गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर आज आमदार सतेज पाटील आजरा तालुकातील शेतकरी, दूध उत्पादक आणि ठरावधारकांची भेट घेतली. या दरम्यान जिल्हा परिषद सदस्य सुधीर देसाई ,उदय देसाई, रणजीत देसाई, शिवसेना ठाकरे जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे, भाजपचे ग्रामीण उपाध्यक्ष जयवंत सुतार, संभाजी पाटील, युवराज पाटील, अनिकेत चराटी या प्रमुख नेत्यांसह दूध उत्पादक, ठरावधारकांच्या भेटी घेतल्या. यावेळी ते बोलत होते.

येत्या २५ वर्षाचा विचार करून दिशादर्शक भूमिका गोकुळच्या विकासासाठी घ्यावी लागेल. त्यासाठी गोकुळमध्ये एकमुखी नेतृत्व असणे गरजेचे आहे. गोकुळच्या प्रगतीसाठी आणि दूध उत्पादक संस्थांना न्याय देण्यासाठी शाहू शेतकरी समविचारी पॅनेलला पाठींबा द्या, असे आवाहन सतेज पाटील यांनी यावेळी केले.

 मुश्रीफ – सतेज विकास पर्व

आजरा जनता बँकेचे मुकुंद देसाई म्हणाले की, जिल्ह्यात सहकार टिकवण्याचे काम अनेकांनी केले आहे. मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वात गोकुळचा कारभार उत्तमरित्या चालला आहे. त्यामुळे आजरेकर पुन्हा एकदा ही सत्ता चांगल्या माणसांच्या हाती देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.