महाराष्ट्र विधान परिषदेच्या कोल्हापूर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या द्वीवार्षिक निवडणुकीत  बुधवारी काँग्रेसचे उमेदवार पाटील सतेज ऊर्फ बंटी डी. यांनी त्यांचे एकेकाळचे राजकीय गुरू, काँग्रेसचे बंडखोर उमेदवार महादेवराव महाडिक यांचा तब्बल ६३ मतांनी पराभव केला. पाटील यांना २२०, तर महाडिक यांना १५७ मते मिळाली. ५ मते अवैध ठरली. जिल्हाधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अमित सनी यांनी पाटील विजयी झाल्याचे घोषित करून त्यांना प्रमाणपत्र दिले. विजयानंतर पाटील समर्थकांनी करवीरनगरीसह जिल्ह्यात एकच जल्लोष केला.
पाटील-महाडिक यांच्यातील चुरशीच्या लढतीतील निकालाकडे सर्वाचे लक्ष वेधले होते. मतमोजणीस तीन टेबलवर सुरुवात झाल्यावर पहिल्याच फेरीत पाटील यांना २१ मतांचे मताधिक्य मिळाले. दुसऱ्या फेरीतही २९ तर अखेरच्या तिसऱ्या फेरीत १३ मतांचे मताधिक्य मिळाले. पाटील यांना २२० तर अपक्ष उमेदवार महाडिक यांना १५७ मते मिळाली. ५ मते अवैध ठरली.
आजच्या निकालामुळे जिल्ह्याचे राजकारण स्वच्छ झाले आहे, असे नमूद करून पाटील यांनी जिल्ह्यातील सुसंस्कृत राजकारणाची वाटचाल सुरू झाली असल्याचा विश्वास व्यक्त करतानाच महाडिक यांना टोला लगावला. पाटील यांनी विजयाचे श्रेय काँग्रेस, राष्ट्रवादी, जनसुराज्य शक्तीसह शिवसेनेच्या मदत केलेल्या सदस्यांनाही दिले.