शाळकरी मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी सुरेश अॅग्लोस्वामी नायडू (रा. शेळके मळा) याला दोषी ठरवून अतिरिक्त जिल्हा व विशेष सत्र न्यायाधीश आर. अस्मार यांनी १० वष्रे सक्तमजुरी व ५५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
शेळके मळा परिसरात राहणारा सुरेश नायडू याने परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला विवाहाचे आमिष दाखवून कर्नाटक राज्यातील हिडकल डॅम व तामिळनाडू राज्यातील सिपलापुत्तुर येथे २७ दिवस घेऊन गेला होता. या कालावधीत तिच्यावर सुरेश याने अतिप्रसंग केला. याबाबत पीडित मुलीच्या वडिलांनी २५ जुल २०१३ रोजी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात आरोपी सुरेश नायडू व किरण मोकाशी यांच्या विरोधात फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी दोघांवर भादंवि कलम ३६६, ३६३, ३७६ आणि लहान मुलांवरील लंगिक अत्याचार विरोधी कायदा कलम ४ अनुसार गुन्हा नोंदविला होता. या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक डी. एस. ढोणे व श्रीमती अर्चना बोदडे यांनी करून याबाबतचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले होते. सुनावणी दरम्यान सरकारी पक्षातर्फे अॅड. एस. बी. सावेकर व व्ही. जी. सरदेसाई यांनी ९ साक्षीदारांचा जबाब न्यायालयासमोर नोंदविले. यामध्ये श्री. सरदेसाई यांनी मांडलेला युक्तिवाद ग्राह्य मानून न्या. अस्मार यांनी सुरेश नायडू यास भादंवि कलम ३६३ प्रमाणे ३ वष्रे सक्तमजुरी व ५ हजार रुपये दंड आणि दंड न दिल्यास ३ महिने साधी कैद, कलम ३७६ व लहान मुलांवरील लंगिक अत्याचार विरोधी कायद्याप्रमाणे १० वष्रे सक्तमजुरी व ५० हजार रुपये दंड, दंड न दिल्यास १ वष्रे साधी कैद अशी शिक्षा ठोठावली. या सर्व शिक्षा आरोपीने एकत्रित भोगायच्या आहेत. तसेच दंडाची रक्कम न्यायालयाकडे जमा केल्यानंतर सदरची रक्कम पीडित मुलीस देण्याबाबत आदेश न्यायालयाने दिले आहेत. तर दुसरा संशयित किरण मोकाशी याची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. सरकार पक्षातर्फे व्ही. जी. सरदेसाई यांनी काम पाहिले. मोकाशी यांच्या वतीने अॅड. मेहबूब बाणदार यांनी काम पाहिले.