सातारा: वाई अर्बन बँकेचे निवृत्त अधिकारी, ज्येष्ठ पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते तसेच संत साहित्याचे गाढे अभ्यासक मधुसूदन दिनानाथ नेने ऊर्फ मधु नेने (वय ७४) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. वाई शहराचा चालता-बोलता सांस्कृतिक, धार्मिक आणि सामाजिक इतिहास असणाऱ्या मधु नेने यांच्या अकस्मात जाण्याने वाई परिसरासह संपूर्ण सातारा जिल्ह्यातील पत्रकारिता, सहकार व वाङ्मयीन क्षेत्रावर गाढ शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सुन, नातवंडे असा परिवार आहे.

​बँकिंग, पत्रकारिता अन् संत साहित्याचा त्रिवेणी संगम ​मधु नेने यांनी वाई अर्बन बँकेत अधिकारी म्हणून प्रदीर्घ काळ उल्लेखनीय सेवा बजावली. निवृत्तीनंतरही त्यांनी सहकार चळवळ आणि बँकिंग क्षेत्रातील घडामोडींवर सखोल लेखन केले. वृत्तपत्रीय पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी स्थानिक आणि सामाजिक प्रश्नांना सातत्याने वाचा फोडली. ‘दैनिक ऐक्य’सकाळ, लोकसत्ता सह विविध वृत्तपत्रे आणि नियतकालिकांमधून त्यांनी प्रदीर्घ काळ अभ्यासपूर्ण वैचारिक लेखन केले. संत साहित्याचे गाढे अभ्यासक असणाऱ्या नेने यांनी प्रवचनकार म्हणून महाराष्ट्रातील विविध भागांत अध्यात्माचा प्रसार केला. सध्या ते ‘सज्जनगड’ मासिकाचे संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत होते.

​अनेक ऐतिहासिक व सामाजिक संस्थांचे आधारस्तंभ ​वाई वसंत व्याख्यानमाला, लोकमान्य टिळक स्मारक संस्था, प्राज्ञ पाठशाळा, मराठी विश्वकोश, वाई कंझ्युमर सोसायटी, जनता अर्बन बँक अशा अनेक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. मकरंद पत्रकार प्रतिष्ठान व वाई तालुका मराठी पत्रकार संघाचे ते प्रमुख मार्गदर्शक होते. ​गंगापुरी कृष्णाबाई संस्थानाशी त्यांचे नाते अत्यंत जिव्हाळ्याचे होते. संस्थानातील उत्सवांची रूपरेषा, अहवाल लेखन आणि वक्त्यांची जबाबदारी ते निष्ठेने सांभाळत असत. वाई शहराचा इतिहास, मंदिरांची माहिती, राजकीय जाण आणि जुन्या आठवणींचा इत्यंभूत साठा असणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ख्याती होती.

​ज्येष्ठ नेत्यांशी व विचारवंतांशी स्नेहाचे संबंध

​विश्वकोशाचे माजी अध्यक्ष तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण, स्वातंत्र्यसेनानी किसन वीर, ज्येष्ठ काँग्रेस नेते प्रतापराव भोसले, माजी खासदार लक्ष्मणराव पाटील, माजी आमदार मदन भोसले आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्यासह राज्यातील अनेक साहित्यिक व राजकीय धुरीणांशी त्यांचे आपुलकीचे संबंध होते. ​त्यांच्या पार्थिवावर वाई येथील भीमकुंडआळी स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने वाईकरांचे आणि सातारा जिल्ह्याचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाल्याची भावना विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी व्यक्त केली आहे.