महेश मांजरेकरांच्या ऐतिहासिक चित्रपटाच्या सेटवर अपघात, कड्यावरून पडून एक गंभीर जखमी

पन्हाळा येथील मुख्य सज्या कोटी ते वारे बुरुज दरम्यान रात्री साडेनऊच्या सुमारास शूटिंगप्रसंगी ही घटना घडली आहे

mahesh manjarekar
(फोटो सौजन्य- संग्रहित छायाचित्र, लोकसत्ता)

कोल्हापूर: पन्हाळगडावर शूटिंगच्या दरम्यान कड्यावरून पडून अपघातात एक कलाकार गंभीर जखमी झाला आहे. त्यास तातडीने उपचारासाठी कोल्हापूरात दाखल करण्यात आले आहे. पन्हाळा येथील मुख्य सज्या कोटी ते वारे बुरुज दरम्यान रात्री साडे नऊच्या सुमारास शूटिंग प्रसंगी ही घटना घडली आहे. नागेश खोबरे (वय १९ सोलापूर) असे जखमीचे नाव आहे.

पन्हाळगडावर विरात वीर दौडले सात या दिग्दर्शक महेश मांजरेकर निर्मित चित्रपटाचे शूटिंग चालू आहे. शुटिंगकरिता मोठ्या प्रमाणात यंत्रणा तैनात केली आहे. रात्रीच्या सुमारास तट बंदीवर शुटींग केले जात आहे. मराठेशाहीच्या इतिहासावर आधारित या सेट मध्ये घोडे, वाहने व मनुष्य यांसह शूटिंगसाठी आवश्यक बाबींचा मोठा समावेश आहे. गेले चार दिवस शूटिंग दिवस-रात्र चालू आहे.

आणखी वाचा- ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटातून महेश मांजरेकरांचा मुलगा सत्यची एक्झिट? एका व्हिडीओमुळे चर्चांना उधाण

अंबरखाना, चार दरवाजा आणि सज्या कोटी ते वारे बुरुज दरम्यान शूटिंग कामी अनेक कलाकार कार्यरत आहेत. त्यातील नागेश हा मोबाईल वर बोलत होता. बोलण्याच्या ओघात तो बुरुजावरून खाली पडल्याने जखमी झाला. त्याला तातडीने कोल्हापूरतील सीपीआर रुग्णालयात दाखल केले आहे.

दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या ‘बिग बजेट’ ऐतिहासिक चित्रपटाची काही महिन्यांपूर्वी घोषणा झाली. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत अभिनेता अक्षय कुमार दिसणार आहे. तर प्रवीण तरडे, हार्दिक जोशी, विशाल निकम, विराट मडके, सत्य मांजरेकर, जय दुधाणे, डॉ. उत्कर्ष शिंदे, नवाब शहा हे कलाकार या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. 

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-03-2023 at 11:36 IST
Next Story
महापुरुषाचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी तक्रार दाखल, तक्रारदार तरुणास मारहाण
Exit mobile version