कोल्हापूर : काही राजांचा स्मृतिदिन आठवावा लागेल एवढे ते दीन होते. फक्त गादीवर बसले म्हणून राजे झाले. त्या तुलनेत राजर्षी शाहू महाराज हे सातत्याने दीनदुबळय़ांसाठी संघर्ष करणारे राजे होते. शाहू महाराजांच्या आयुष्यात अनेक संघर्ष झाले. शाहू महाराज लढले ती प्रवृत्ती अजूनही संपलेली नाही, असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी व्यक्त केले.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा १०० वा स्मृतिदिन हा कृतज्ञता पर्व म्हणून साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त येथील शाहू मिलमध्ये आयोजित कृतज्ञता सभेत मुख्यमंत्री ठाकरे दूरदृश्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन करत होते.
ते म्हणाले, राज्य शासन शाहू महाराजांचे स्मारक बांधणार आहे; पण त्यासाठी पैसे कुठे आहेत अशी विचारणा काही जण करीत आहेत. या कुचाळक्या वृत्तीच्याच विरोधात शाहू महाराज यांनी संघर्ष केला. ज्या वृत्तीविरोधात महाराज लढले ती वृत्ती आज खरोखर संपली आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. मी माझ्या आजोबांकडून जे ऐकले त्यातून शाहू महाराज हे कोणत्याही व्यक्ती विरुद्ध नव्हते तर ते वृत्ती विरुद्ध होते हे स्पष्ट होते. छत्रपती शिवाजी, शाहू महाराज यांना अपेक्षित असलेला समाज आणि राज्य निर्माण करण्यासाठी एकत्र येऊन काम करू, असे आवाहन त्यांनी केले.
कोणत्याही महापुरुषाच्या स्मारकासाठी अंदाजपत्रकातील निधी ठेवण्याची आवश्यकता नाही. शाहू स्मारकासाठी लागेल तेवढा निधी शासन उपलब्ध करून देईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांचे भाषण झाले. जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महापालिका आयुक्त कादंबरी बलकवडे यांनी शाहू महाराज स्मारक आराखडाबाबत माहिती दिली.